आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभापतींविरुद्ध एल्गार; सातपूर प्रभाग बैठकीत गोंधळ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर- महापालिकेच्या सातपूर प्रभागाची दुसरीच बैठक मंगळवारी अभूतपूर्व गोंधळात पार पडली. पिण्याच्या पाण्याप्रश्नी नगरसेवक दिनकर पाटील यांनी प्रभागातील नागरिकांसह सभागृहातच ठिय्या मांडत आंदोलनाचा फार्स केला.
मागील सभेच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाही तोपर्यंत सभा चालू ठेवण्याची मागणी नगरसेवकांनी लावून धरली असताना सभापतींनी अचानक सभा संपल्याचे जाहीर करून राष्ट्रगीतही सुरू केले. त्यामुळे सर्वच नगरसेवकांनी सभापतींच्या या कृतीचा निषेध नोंदवून विकासासाठी एकत्र येण्याची शपथ यावेळी घेतली.
सातपूर प्रभागाची मासिक सभा मंगळवारी सभापती सचिन भोर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेच्या प्रारंभीच पाण्याच्या प्रश्नावरून प्रभाग 17 मधील नागरिकांना बळजबरीने दिनकर पाटलांनी सभागृहात घुसविले. सभापतींनी त्यांना बाहेर जाण्यासाठी सांगितल्यानंतर वादास तोंड फुटले. अगोदर निवेदन घ्या त्यानंतर लोक बाहेर जातील, तुम्ही लोकशाहीचा गळा घोटू नका, आम्ही लोकशाही पध्दतीने निवेदन देण्यासाठी आलो आहोत, असे सांगितल्यानंतर सभापतींनी नागरिकांचे निवेदन स्वीकारले. तत्पूर्वी पाटील यांच्या या आततायी कृतीची चर्चा सभागृहात सुरू होती. त्यानंतर अकरा जादा विषयांना यावेळी मंजुरी देण्यात आली. यानंतर चर्चासत्रात सर्वच सदस्यांनी प्रभागातील समस्यांचा पाढा वाचत खुलासा करण्याची मागणी केली. अधिकारी खुलासा करीत असतानाच सदस्यांनी गोंधळ घातला. याचवेळी सभापतींनी सभा संपल्याचे जाहीर करून राष्ट्रगीतास सुरुवात केली. राष्ट्रगीत संपताच सर्वच नगरसेवकांनी पुन्हा सभागृहातच बसून सभापतींचा निषेध केला.
9 तारखेला होणार्‍या महासभेत सर्वांनी याविरुध्द एकत्रित आवाज उठविण्याचा निर्णय या नगरसेवकांनी घेतला. सभापतींनी लोकशाहीला काळिमा फासण्याचे काम केल्याचा आरोप दिनकर पाटील यांनी केला. नगरसेवकांना विश्वासात न घेता सभापतींनी सभा आटोपती घेतली. यामुळे अधिकार्‍यांचा उर्मटपणा वाढेल, असा आरोप सलिम शेख यांनी केला. सभापतींनीच कामचुकार अधिकार्‍यांना पाठीशी घातल्याचा आक्षेप विलास शिंदे यांनी नोंदवला. सभापतींनी अधिकार्‍यांना पाठीशी घातल्याने मी त्यांचा निषेध करीत असल्याची भूमिका नंदिनी जाधव यांनी स्पष्ट केली.
बैठकीनंतर सभापतींनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. केवळ फोटो काढण्यापुरत्या असलेल्या आंदोलनास मी बगल देऊन सभा यशस्वीरीत्या पार पाडली, असे त्यांनी स्पष्ट केले. नंदिनी जाधव यांनी इतर पक्षातील नगरसेवकांच्या दबावाखाली येऊन अशी वक्तव्ये केल्याचे ते म्हणाले.