आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक शहर विकास आराखड्यात गैरव्यवहार; आरक्षण पेटले, शेतकरी एकवटले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहर विकास आराखड्यातील गैरप्रकारामुळे असंतोष निर्माण झाल्याने शहरासह परिसरातील शेतकरी सोमवारी महासभेच्या दिवशी आरक्षणविरोधात एकवटले. संतप्त झालेल्या या शेतकर्‍यांना आवर घालण्यासाठी राज्य राखीव दलाच्या तुकडीसह पोलिसांना धाव घ्यावी लागली. महासभेत सर्वपक्षीय सदस्यांनी एकमुखाने विकास आराखड्याला विरोध केल्यानंतर काही प्रमाणात आंदोलनग्रस्तांचा विरोध मावळला.

प्रारूप आराखडा फुटीप्रकरणी गेल्या महिनाभरापासून वादळ सुरू आहे. पंचवटी, मेरी म्हसरूळ, मखमलाबाद, सातपूर, सिडको, पाथर्डी, इंदिरानगर, मखमलाबाद या भागातील अनेक छोट्या-मोठय़ा शेतकर्‍यांच्या जमिनींवर आरक्षण पडल्याने या विरोधात शेतकर्‍यांसह लोकप्रतिनिधींकडून आंदोलन सुरू आहे. आराखडा फेटाळावा, मंजूर करावा की नामंजूर करावा याविषयी गेल्या काही दिवसांपासून खल सुरू होता. विकास आराखड्यावरून महासभेत व त्यापूर्वी सत्ताधारी मनसेला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली होती. त्यातही राष्ट्रवादी कॉँग्रेसने महासभेअगोदरच आपला मोर्चा रामायण या महापौरांच्या निवासस्थानी वळविला. खासदार समीर भुजबळ यांच्यासह आमदार जयवंत जाधव, गटनेत्या कविता कर्डक, शहराध्यक्ष शरद कोशिरे, नाना महाले, नगरसेवक विक्रांत मते, सचिन महाजन, समाधान जाधव, कन्हैया साळवे, नगरसेविका सुनीता निमसे पाटील, रंजना पवार यांनी महापौरांना घेराव घातला. याचवेळी चेहडी, देवळाली, चाडेगाव येथील संतप्त शेतकर्‍यांनीही रामायण गाठल्याने काही काळ या भागात तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती. यामुळे राज्य राखीव दलाच्या तुकडीसह पोलिसांना पाचारण करावे लागले. खासदार भुजबळ यांनी महापौर अँड. यतिन वाघ यांच्याशी चर्चा केली.

आयुक्तांनाही निवेदन
खासदार समीर भुजबळ यांनी आयुक्त संजय खंदारे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या वेळी ते म्हणाले की, चुकीच्या आरक्षणामुळे शेतकर्‍यांच्या भावी पिढीचा प्रश्न निर्माण झाला आहे. आरक्षणामध्ये मेट्रो, स्टेडियमसारख्या महत्त्वाच्या प्रयोजनासाठी तरतूदच केलेली नाही. त्यामुळे सुधारित आराखड्यासाठी शासनाकडे मागणी करावी.

सभागृहात खासदार, आमदारांची उपस्थिती
विकास आराखड्याविषयी सभागृहात नेमके काय घडते याविषयीची बारकाईने माहिती घेण्यासाठी सभागृहात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार समीर भुजबळ, आमदार जयवंत जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार अँड. उत्तम ढिकले, आमदार नितीन भोसले यांनी सभागृहातील बाल्कनीत कार्याकर्त्यांसह ठाण मांडले होते. आराखड्याच्या निमित्ताने अशाप्रकारे पहिल्यांदाच खासदार, आमदारांनी महापालिकेच्या सभागृहात बैठक मारली असावी.

आरक्षण.. शेतकर्‍यांच्या जमिनींचे भक्षण
गुन्हा दाखल : पोलिसांची परवानगी नसतानाही स्पीकर लावून घोषणाबाजी केल्याने मुंबई पोलिस कायदा कलम व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अशोक खालकर, किरण अरिंगळे, रमेश औटे, सुनील आडके, वसंत अरिंगळे, शिवाजी भागवत, कन्हैया साळवे, हरीश भडांगे, अरुण भोर यांच्यासह 25 जणांवर गुन्हा .

वाहतूक ठप्प : सिन्नरकडे जाणार्‍या मार्गावर चेहडीपर्यंत, तर नाशिककडच्या मार्गावर शिवाजी पुतळा व उड्डाणपुलावर वाहतूक ठप्प

रास्ता रोको : शहर विकास आराखड्यात देवळाली गाव शिवारात टाकण्यात आलेला औद्योगिक पट्टा रद्द करावा यामागणीसाठी परिसरातील शेतकर्‍यांनी अशोक खालकर व रमेश औटे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी सिन्नर फाटा येथील मारुती मंदिराजवळ रास्ता रोको

सहभाग : या आंदोलनात आडगाव, मखमलाबाद, नांदूर, मानूर आणि सातपूर येथील आरक्षणग्रस्त शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

खळखट्याक : शेतकर्‍यांकडील खळखट्याकचा आवाज आता का बंद झाला, असे फलक लक्ष वेधत होते. महासभा सुरू असल्याने शेतकर्‍यांची भरपावसातही निदर्शने सुरू होती.

एकी : आडगाव, मखमलाबाद, सातपूर, नांदूर-मानूरसह नाशिकरोड परिसरातील शेतकरी एकत्र आले असून मोर्चा, निदर्शने आणि बैठकांचे आयोजन करण्यात आले असून रोष व्यक्त केला.

निदर्शने : शहर विकास आरखड्यात शेतकर्‍यांवर अन्याय झाल्याने महापालिकेविरोधात शेतकरी एकवटले असून त्यांनी सोमवारी राजीव गांधी भवनसमोर निदर्शने केली.