आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टोल’कडे पाठ; बैठकीस साथ-साथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज ठाकरे यांनी कानपिचक्या दिल्यानंतरही आपसातील मतभेद व वैयक्तिक कारणामुळे टोलविरोधातील आंदोलनाकडे पाठ फिरवणारे मनसेचे पदाधिकारी मनसेच्या पुण्यातील बैठकीसाठी मात्र साथ-साथ गेल्याचे वृत्त आहे. लोकसभेसाठी नाशिक मतदारसंघातून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे शुक्रवारी होणार्‍या बैठकीत मनसेकडूनही तुल्यबळ उमेदवार देण्याच्या दृष्टीने चाचपणी होण्याची शक्यता आहे.

जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात राज यांच्या नाशिक दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत गटबाजी उफाळून आली होती. त्याचा फटका नाशिकमधील मनसेच्या प्रतिमेला बसत असल्याचे बघून राज यांनी पदाधिकारी व नगरसेवकांची झाडाझडती घेतली. त्यांनतर मुंबईत बोलवून विकासासाठी एकत्र आले नाही तर सत्ता सोडण्याची तयारी करा, असेही सुनावले होते. त्यानंतर शहरात अतिक्रमण निर्मुलन मोहिमेपासून तर अन्य चमकदार कामे करण्यासाठी मनसेचे नेते एकत्र आल्याचे चित्र होते; मात्र राज यांनी टोलविरोधात भूमिका मांडल्यावर नाशिकमधील मनसेच्या कारभार्‍यांची एकजूट होऊ शकली नाही. परिणामी या आंदोलनाचा बार फुसका ठरल्याचे चित्र होते. या मुद्यावरून पुन्हा राज यांच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो, हे ओळखून पुणे येथील बैठकीसाठी तिन्ही आमदार, सर्व पदाधिकारी गेल्याचे समजते. या बैठकीसाठी आमदार वसंत गिते, अँड. उत्तमराव ढिकले, नितीन भोसले, प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक, जिल्हाप्रमुख सचिन ठाकरे, प्रकाश दायमा, संदीप पाटील आदींसह इतर पदाधिकारी रवाना झाले.

उमेदवारीबाबत उत्सुकता
नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्या उमेदवारीच्या चर्चेने जोर धरल्यानंतर मनसेनेही सावध पवित्रा घेत संभाव्य उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांना पर्याय म्हणून उमेदवारांची चाचपणी केल्याचे वृत्त होते. त्यातून ज्येष्ठ आमदार अँड. उत्तमराव ढिकले यांचेही नाव पुढे आले होते. एकूणच परिस्थितीचा अभ्यास करून पुणे येथे होणार्‍या बैठकीत नाशिक मतदारसंघातील मनसेच्या रणनीतीबाबतही चर्चा होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या बैठकीत राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघांचा ठाकरे आढावा घेणार आहेत.