आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Market Comity And Food And Drugs Commissioner Investigation Start

कार्बाइडप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पंचवटीतील पेठरोडवरील शरदचंद्र पवार फळ मार्केटमध्ये सापडलेल्या कार्बाइडच्या ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

या वृत्ताची बाजार समितीनेही गंभीर दखल घेत शनिवारी मार्केटमध्ये पाहणी करून फळ व्यावसायिकांना लेखी नोटिसा बजावल्या. यात फळ पिकविण्यासाठी रसायन न वापरण्याची तंबी दिली. मात्र, अन्न व औषध प्रशासनाचा एकही अधिकारी शनिवारी मार्केटमध्ये न फिरकल्याने या खात्याच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

शरदचंद्र पवार फळ मार्केटमध्ये व्यापार्‍यांकडून आंबे व अन्य फळे पिकवण्यासाठी कार्बाइड या घातक रसायनाचा वापर केला जात असल्याच्या प्रकरणाचा ‘दिव्य मराठी’ने पर्दाफाश केला. यात फळ मार्केटमध्ये व पाठीमागे हौद भरून वापरले गेलेले कार्बाइडची पाकिटे मोठय़ा प्रमाणात आढळली. या प्रकरणी बाजार समितीने शनिवारी सकाळी व्यापारी प्रतिनिधी झवर यांच्यासमवेत बैठक घेत व्यापार्‍यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले. सकाळी समितीचे निरीक्षक गणेश सांगळे आणि कर्मचार्‍यांनी मार्केट परिसरात पाहणी करून सर्वच व्यापार्‍यांना नोटिसा दिल्या. कारवाईबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासन सहआयुक्तांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ज्या विभागावर नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी आहे त्या विभागाचे सहआयुक्त या धक्कादायक प्रकाराबाबत किती गंभीर आहेत, हे यावरून स्पष्ट होत आहे. या सर्व प्रकरणामध्ये अन्न व औषध प्रशासनाची भूमिका सुरुवातीपासूनच संशयास्पद राहिली आहे. आंबा हंगामाच्या सुरुवातीला थातुरमातुर कारवाई करण्यात आली. त्यानंतर सर्वच छोट्या-मोठय़ा व्यावसायिकांना हे घातक रसायन वापरण्याची मुभा दिली, असे काही व्यापार्‍यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

अशी होती पिकवण्याची प्रक्रिया : फळाच्या एका क्रेट्मध्ये एक पुडी ठेवली जाते. या एका पुडीमध्ये 100 ते 150 ग्रॅम कार्बाइड ठेवल्यास सुमारे 20 किलो आंबा एक रात्रीत पिकतो.

आरोग्यास घातक
कृत्रिमरीत्या आंबे अथवा फळे पिकवणे आरोग्यास घातक आहे. यामधील रसायन कार्सोनोजेनिक म्हणजे कॅन्सरला पोषक वातावरण निर्माण करते. यामुळे कॅन्सरचा धोका वाढण्याची दाट शक्यता असते. यासाठी नैसर्गिकपणे पिकवलेली फळे खावी. फळ पिकविण्यासाठी घातक रसायन वापरणार्‍या व्यावसायिकांवर संबंधित विभागाने कारवाई करावी. डॉ. रवींद्र शिंगे, जिल्हा शल्यचिकित्सक

आजारांना निमंत्रण
रसायनाने पिकवलेली फळे आजारांना निमंत्रण देतात. फळे पिकवताना रसायनांचा वापर केल्याने हृदयाचे व श्वसनाचे विकार होतात. लहान मुलांमध्ये पोटाचे विकार काही दिवसांत दिसतात. प्राचार्य डॉ. राजेंद्र भांबर, फार्मसी कॉलेज, नाशिक

नोटिसा दिल्या
मार्केटमधील व्यापार्‍यांना नोटिसा दिल्या असून, ज्या व्यावसायिकांकडे कार्बाइड आढळेल त्यांचा परवाना रद्द करून त्यांचा गाळा जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल. ए. बी. शेवाळे, सहसचिव, बाजार समिती