आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्यांच्या वर्षावात नाशिकच्या महापौरांचा दौरा गेला वाहत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महापालिकेतील मनसेच्या कामकाजावर टीका सुरू झाल्यानंतर सत्ताधार्‍यांनी ‘महापौर तुमच्या दारी’ हा उपक्रम सुरू केला; परंतु त्याचे कौतुक होण्याऐवजी त्यावर टीका होऊ लागल्याने हा दौराच थांबविण्याची नामुष्की मनसेवर ओढावली आहे.

महापौरांच्या दौर्‍याला पर्याय म्हणून आता प्रभागनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका पक्षाने सुरू केल्या आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पालिकेत धुवाधुवीच सुरू असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे गेल्या वर्षी नागरिकांनी मनसेला कौल दिला. मनसेच्या सत्ताकाळात ‘नवनिर्माण’ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच सत्ताधार्‍यांचे वर्ष सरले; परंतु जकात वसुलीचे खासगीकरण वगळता कुठलीही चमकदार कामगिरी मनसेला करता न आल्याने कुठून यांना सत्ता बहाल केली, अशी प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होऊ लागली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या कामकाजावरही यानिमित्ताने टीका सुरू झाली. या पार्श्वभूमीवर ‘महापौर तुमच्या दारी’ उपक्रम सुरू करून प्रभागनिहाय जनतेपर्यंत पोहोचण्याचा फंडा शोधण्यात आला. या उपक्रमात संबंधित मतदारसंघातील आमदारांनीही सहभागी व्हायला लागले. परंतु दौर्‍यात मांडलेल्या समस्या सुटत नसल्याने नागरिक नाराज झाले. त्यामुळे दौरा अंगलट येण्याच्या भीतीने तो बंद करण्याची भूमिका महापौरांनी घेतलेली दिसते. गेल्या महिन्यापासून असा दौरा न झाल्याने मनसेच्याच पदाधिकार्‍यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

बैठकांना गंध निवडणुकांचा
‘महापौर तुमच्या दारी’ उपक्रम बंद झाल्यानंतर आता मनसेने कार्यकर्त्यांच्या प्रभागनिहाय बैठका सुरू केल्या आहेत; परंतु त्यालाही विधानसभा निवडणुकीचाच गंध येत असल्याचे काही कार्यकर्त्यांनी सांगितले.

गटनेत्यांनी मागवला लेखाजोखा
मनसेचे नगरसेवक महापालिकेत विशेष कामगिरी करत नसल्याची ओरड काही दिवसांपासून सुरू आहे. याचा फायदा घेत विरोधी पक्षही आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर गटनेते अशोक सातभाई यांनी मनसेच्या नगरसेवकांकडून वर्षभराच्या कामगिरीचा अहवाल मागविला आहे. आपापल्या प्रभागात वर्षभरात किती कामे केली, याचा लेखाजोखा नगरसेवकांनी आणून देणे यात अपेक्षित आहे.