आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर वाहनासह मनविसेच्या दिमतीस; स्वहस्ते केले संघटनेच्या सभासदांना ओळखपत्र वितरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसह नानाविध समस्यांनी डोके वर काढल्याच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींकडून त्यांचे निराकरण होण्याची अपेक्षा व्यक्त होत असताना महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांचे वाहन बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सेवेत दिसले. शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांनी सरकारी वाहन खासगी दौर्‍यासाठी देण्याबरोबरच स्वहस्ते संघटनेच्या नवीन सदस्यांना ओळखपत्रेही वितरित केल्याच्या प्रकाराची चर्चा महाविद्यालयांसह राजकीय वतरुळात रंगली होती.
सामाजिक अथवा शासकीय कामांसाठीच सरकारी वाहनाचा वापर करण्याचा दंडक आहे. परंतु, संघटनेच्या पदाधिकार्‍यांना महापौरांच्या सरकारी वाहनात बसवून संघटनेच्या उपक्रमासाठी त्याचा सर्रास वापर करण्यात आल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकही चकित झाले.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने 11 डिसेंबरपासून शहर आणि जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांत सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ केला आहे. त्याची सुरुवात शहरातील बीवायके महाविद्यालयापासून झाली. त्यानंतर एचपीटी, भोंसला आणि टप्प्याटप्प्याने शहर व परिसरातील इतर महाविद्यालयांमध्ये दौर्‍याचे नियोजन करीत विद्यार्थ्यांकडून सभासदत्वाचे अर्ज भरून घेण्यात आले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना मनविसेचे ओळखपत्र थेट महापौरांच्याच हस्ते वितरित करण्यात आले. महापौरांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे अथवा मनसे प्रदेशाध्यक्षांच्या दौर्‍यात सहभागी होणे एक वेळ ठीक; पण संघटनेच्या तिसर्‍या फळीच्या कार्यक्रमास इतर सर्व महत्त्वाच्या जबाबदार्‍या सोडून, तसेच नागरी समस्यांच्या निराकरणाकडे दुर्लक्ष करीत शासकीय वाहनासह उपस्थित राहणे कितपत योग्य, असा प्रश्न यामुळे उपस्थित करण्यात येत आहे.
धावते फोल दौरे
अ‍ॅड. वाघ यांनी मध्यंतरी ‘महापौर तुमच्या दारी’ हा उपक्रम सुरू केला होता. या दौर्‍यात विभागीय स्तरावरील अधिकार्‍यांशिवाय अन्य वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले नव्हते. त्यामुळे या समस्या अद्यापही सुटू शकलेल्या नाहीत. यातील बहुतांश दौरे तर अगदीच धावत्या पद्धतीने घेण्यात आल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
पहिल्या दिवशी 4350 विद्यार्थ्यांची नोंदणी
बुधवारी नऊ महाविद्यालयांत चार हजार 350 विद्यार्थी सभासदांची नोंदणी झाली. बीवायके महाविद्यालय : 800, केटीएचएम : 950, एचपीटी : 350, जनता विद्यालय, सातपूर : 250, बिटको महाविद्यालय, नाशिकरोड : 400, भाटिया महाविद्यालय : 550, संदीप फाउंडेशन : 250, ब्रम्ह व्हॅली : 200, वावरे महाविद्यालय, सिडको: 600 अशी नोंदणी करण्यात आली. या वेळी मनसे प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक, मनविसे प्रदेशाध्यक्ष आदित्य शिरोडकर, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष खंडेराव मेढे, जिल्हाध्यक्ष बंटी कोरडे, संदीप भवर, अजिंक्य गिते आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.