आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरांना सातपूरमध्ये अपूर्ण नाल्याप्रश्नी घेराव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अशोकनगर ते सातपूर अमरधामपर्यंत नाल्यात पाइपलाइन टाकण्याचे काम ठेकेदाराने बंद केल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी महापौर अशोक मुर्तडक यांना रविवारी घेराव घालत हे काम पूर्ण करण्याची मागणी केली. यानंतर महापौरांनी या संदर्भात सोमवारी (दि.१७) तातडीची बैठक बोलावली असून या बैठकीत काय निर्णय होतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सातपूर विभागातील विश्वासनगर संभाजीनगर या परिसरातील ड्रेनेजचे पाणी नाल्याद्वारे सोडण्यात आल्याने या परिसरात दुर्गंधी डासांचा उपद्रव वाढला होता. हा नाला बंदिस्त करण्याची मागणी गत सिंहस्थापासून नागरिक करीत होते. नागरिकांच्या आग्रहास्तव सभागृहनेते शशिकांत जाधव यांनी प्रशासनाकडे हा विषय लावून धरल्याने अशोकनगर ते सातपूर अमरधामपर्यंत पाइपलाइन टाकण्यासाठी साडेचार कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली. या कामाचा ठेकादेखील देण्यात आला आहे. मात्र गेल्या ते महिन्यांपासून हे काम बंद पडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

रविवारी स्वच्छता मोहिमेच्या निमित्ताने महापौर अशोक मुर्तडक सातपूर येथे आले असता नागरिकांनी त्यांना घेराव घालत डेंग्यूची साथ पसरल्याने त्यांच्यासमोर प्रामुख्याने या नाल्याचा प्रश्न मांडला. महापौरांनी नागरिकांचे गाऱ्हाणे ऐकल्यानंतर सभागृहनेते शशिकांत जाधव, सातपूर प्रभागाच्या सभापती सुरेखा नागरे, नगरसेविका उषा शेळके यांच्यासह या नाल्याच्या कामाची पाहणी केली. कामाची स्थिती बघून त्यांनी पालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांशी भ्रमणध्वनीवर लगेचच संपर्क साधून याप्रश्नी तातडीची बैठक घेण्याचे आदेश दिले. यानुसार यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. महापौरांकडे गाऱ्हाणे मांडल्यानंतर त्यांनी तातडीने बैठक बोलावल्याने अपूर्ण असलेले नाल्याचे काम पूर्ण होईल अशी आशा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.