आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या हिवाळी परीक्षा लांबणीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कर्मचार्‍यांच्या कामबंद आंदोलनामुळे येत्या 26 नोव्हेंबरपासून वैद्यकीय अभ्यासक्रमांशी संबंधित सुरू होणारी हिवाळी परीक्षा लांबणीवर पडली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी शनिवारी याबाबतचा आदेश काढून परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्याचे जाहीर केले. दरम्यान, आंदोलनामुळे पुनर्मूल्यांकनाच्या निर्णयाचीही अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे.
कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी विद्यापीठाच्या तिन्ही संघटनांतर्फे आरोग्य विद्यापीठात गेल्या सहा दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर तोडगा निघत नसल्यामुळे विद्यापीठाची जवळपास सर्वच कामे खोळंबली आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, येत्या 26 नोव्हेंबरपासून विद्यापीठाच्या सर्वच अभ्यासक्रमांची हिवाळी परीक्षा नियोजित होती. परंतु, या परीक्षेस साहाय्य करण्यास कर्मचार्‍यांनी असर्मथता दर्शविल्याने परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला. त्यामुळे राज्यभरातील सुमारे 150 केंद्रांतील वैद्यकीय अभ्यासक्रमाशी संबंधित या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनाचा निर्णय रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रदीर्घकाळ आंदोलन छेडले होते. त्यानंतर पुनर्मूल्यांकनाच्या पद्धतीवर विद्यापीठाने पुन्हा शिक्कामोर्तब केले खरे; परंतु कर्मचार्‍यांच्या सध्या सुरू असलेल्या आंदोलनानंतर या निर्णयाची अंमलबजावणीही पुढे ढकलली आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांमध्ये चलबिचल वाढली आहे. निकाल जाहीर होत नाही तोपर्यंत पुढील अभ्यासास सुरुवात करावी की नाही, अशा द्विधा मन:स्थितीत संबंधित विद्यार्थी आहेत. तसेच, राज्यपाल कार्यालयाने सोपविलेला आंतरविद्यापीठ क्रीडामहोत्सव आयोजनाबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, कर्मचार्‍यांच्या आंदोलनास राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पाठिंबा जाहीर केल्याचे संघटनेचे जिल्हा निमंत्रक उत्तम गांगुर्डे यांनी जाहीर केले. याबाबतच्या पत्रकात म्हटले की, संघटनेच्या प्रतिनिधींनी आंदोलकांची भेट घेतली. या वेळी विद्यापीठ कर्मचार्‍यांच्या मागण्यांसंदर्भात मंत्रालय स्तरावर संबंधित विभागाकडे विचारणा करण्यासाठी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांमार्फत प्रयत्न करण्यात येतील, असे संघटनेचे कार्याध्यक्ष महेश आव्हाड यांनी सांगितले.
परीक्षार्थींची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय
विद्यापीठ कर्मचार्‍यांच्या आंदोलनामुळे नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आंदोलनकाळात परीक्षार्थींची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
डॉ. अरुण जामकर, कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
अनेक मागण्या प्रलंबित
विद्यापीठास महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करणे, नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शासन पदावर कार्यरत अधिकारी व कर्मचार्‍यांना सेवानिवृत्ती योजना लागू करणे, 2005 नंतर शासनमान्य पदावर कार्यरत अधिकारी व कर्मचार्‍यांना नवीन अंशदायी निवृत्तिवेतन योजना लागू करणे, नवीन पदनिर्मिती करणे, विद्यापीठ निधीतील पदांवर नियुक्त कर्मचार्‍यांना विद्यापीठ निधीत कायम करणे आदी मागण्यांसाठी आमचे आंदोलन सुरू आहे.
दीपक शेळके, अध्यक्ष, शिक्षकेतर कर्मचारी संघटना