आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक मेट्रोसाठी आता शिवसेनेची ‘दिल्लीवारी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केंद्रातील भाजप सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात 20 लाख लोकसंख्येच्या शहरांसाठी ‘मेट्रो’ची सुविधा देण्याची तरतूद असल्याचे हेरून आता शिवसेनेने नाशिकमध्ये ही सेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रो महत्त्वाची असल्यामुळे पालिकेकडून तातडीने केंद्राला प्रस्ताव पाठवला जाणार आहे. तर, दुसरीकडे खासदार व पालिका पदाधिकार्‍यांचे शिष्टमंडळ दिल्लीवारी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री अरुण जेटली यांना साकडे घालणार असल्याची माहिती शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.

पत्रकारांशी बोलताना बोरस्ते म्हणाले की, नाशिक शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस उग्र होत आहे. शहराच्या मध्यवस्तीतील रस्ते छोटे आहेत व नेमकी हीच बाजारपेठ असल्याने वाहतूक कोंडी वाढत आहे. मुंबई, पुण्यानंतर सर्वच दृष्टीने नाशिक आकर्षणाचे केंद्र असून, येथे मेट्रोसारखी वाहतूक व्यवस्था निर्माण होण्याची गरज आहे. यापूर्वी मेट्रोपासून तर ट्रॅमपर्यंत अनेक पर्यायांची चाचपणी झाली; मात्र प्रत्येकवेळी निधीची अडचण आली. सद्यस्थितीत केंद्रातील भाजप सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात अंतर्गत प्रवासी वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मेट्रोची तरतूद केली आहे. त्याचा फायदा नाशिक पालिकेला होऊ शकतो. त्यामुळे मेट्रोची गरज व त्यासाठी विकास आराखड्यात आताच आरक्षण करून आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी पालिका अधिकार्‍यांबरोबर तातडीने बैठक घेऊन प्रस्ताव तयार केला जाईल. हा प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्राला पाठवला जाईल. दुसरीकडे खासदार हेमंत गोडसे यांच्यासह सर्व पदाधिकार्‍यांबरोबर प्रमुख केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे.

राष्ट्रवादीच्या ‘ग्रेटर नाशिक’; मनसेच्या ट्रॅमला ‘उत्तर’
यापूर्वी माजी खासदार समीर भुजबळ यांनी नाशिक व लगतच्या ग्रामीण भागातून ‘ग्रेटर नाशिक’ असा मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे मांडला होता. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेट्रो होऊच शकत नाही, असे स्पष्ट मत व्यक्त करीत ट्रॅमसाठी चाचपणी सुरू केली होती. अशा स्थितीत अर्थसंकल्पातील मेट्रोच्या तरतुदीचा आधार घेत सेनेने दोघांनाही शह देण्याचा प्रयत्न केला आहे.
पंतप्रधानांची भेट घेणार
अर्थसंकल्पातील तरतुदींचा नाशिकला लाभ मिळावा, असा शिवसेनेचा प्रयत्न आहे. ठोस आर्थिक तरतुदीमुळे खासदार व पदाधिकार्‍यांचे शिष्टमंडळ पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन त्यांना साकडे घालतील.
अजय बोरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना
..तर शहर वायफाय
देशातील शंभर शहरांचे सॅटेलाईट व मेट्रो सिटीत रूपांतराची पंतप्रधानांची योजना आहे. त्यात नाशिकच्या समावेशासाठी प्रयत्न केला जाणार आहे. मेट्रो सिटीचा दर्जा मिळाल्यास शहर वायफाय होईल, असेही बोरस्ते यांनी सांगितले.