आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारांना आव्हान स्वपक्षीयांकडूनच; विधानसभा मुदतपूर्तीपूर्वीची स्थिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- देवळाली व पंचवटी विधानसभा मतदारसंघातील दोन्ही आमदारांपुढे निवडणूकीपूर्वीच स्वपक्षीयांचेच आव्हान उभे ठाकले आहे. इच्छुकांकडून सर्मथकांच्या बैठका व वाढदिवसानिमित्तच्या कार्यक्रमातून झालेल्या वातावरण निर्मितीमुळे हे आमदार चिंताग्रस्त झाले आहेत. पंचवार्षिकच्या अखेरच्या टप्प्यात विकासकामांवर लक्ष केंद्रित करून जनतेची नाराजी दूर करण्याबरोबरच सर्मथक व विरोधकांची जुळवाजुळव करण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे.
विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत नव्याने निर्माण झालेल्या पंचवटी मतदारसंघात मनसेने पहिल्याच प्रयत्नात अँड. उत्तमराव ढिकले यांच्या रूपाने पक्षाचा झेंडा फडकवला. मिळालेल्या संधीचा सदुपयोग करीत त्यांनी कामाचा ठसा उमटविला. आता पंचवार्षिकची मुदत पूर्ण होण्यास काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या काळात पक्ष बांधणी व सर्मथकांची जुळवाजुळव करण्यावर भर देण्याची गरज असताना मतदारसंघात नगरसेवकांना आमदारकीचे स्वप्न पडू लागले आहेत. इच्छुकांकडून चाचपणीच्या निमित्ताने वेगवेगळे निमित्त साधून आयोजित कार्यक्रमांतून वातावरणनिर्मिती केली जातअसल्याने आमदारांची डोकेदुखी वाढली आहे.
अलीकडे कधीच वाढदिवस साजरा न करणारे मनसेचे गटनेते अशोक सातभाई यांनी रविवारी तो साजरा करून उमेदवारीसाठी दावेदार असल्याचे दाखवून दिले. आमदार वसंत गिते, अतुल चांडक यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवली; मात्र आमदार ढिकलेंची गैरहजेरी सर्वांनाच जाणवली.
सातभाईसह आमदार ढिकलेंच्या विजयात मोलाचे र्शेय असलेले स्थायी समितीचे सभापती आर. डी. धोंगडे हेदेखील दावेदार असले तरी त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमाव्दारे वातावरणनिर्मिती केलेली नाही. नगरसेविका संगीता गायकवाड यांचे पती व्यापारी बॅँकेचे संचालक हेमंत गायकवाड यांचीही याबाबतची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यांनी सामाजिक कार्यक्रमातून इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत. निम्म्या मतदारसंघात सीसीटीव्ही कॅमेरे लावून मतदारांच्या मनात जागा निर्माण केली आहे. निवडणुकांना वेळ असला तरी अनेकांच्या दावेदारीमुळे पक्षाची अडचण होण्याची शक्यता आहे.
भाजपात दावेदारी
आमदार ढिकले यांच्या विरोधात पराभव पत्करावा लागलेले भाजपचे उमेदवार बाळासाहेब सानप यांच्यासह प्रा. सुहास फरांदे इच्छुक आहेत. त्यात व्यापारी बॅँकेचे संचालक सुनील आडके यांची भर पडली आहे. यंदा आधीपासूनच त्यांनी उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. निसर्गरम्य वातावरणात झालेल्या बैठकीस भाजपसह इतर पक्षांतील सर्मथक सहकार्‍यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.
आमदार घोलप षटकार मारण्याच्या तयारीत
देवळाली मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सलग पाच वेळा या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक जिंकून यंदा षट्कार मारण्याच्या तयारीत आमदार बबनराव घोलप असले तरी त्यांचे पुत्र योगेश घोलप हे वडिलांच्याच माध्यमातून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. गत निवडणुकीत प्रताप मेहरोलिया यांनी त्यांना आव्हान दिले होते. ते शिवसेनावासी झाल्याने त्यांचेही उमेदवारीसाठी प्रयत्न आहेत.