आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा निवडणूक : वाकचौरेंविरोधात घोलप यांच्या उमेदवारीसाठी आग्रह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - शिर्डी लोकसभा मतदारसंघावर भगवा फडकविण्यासाठी कधीकाळी भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवसेनेत आणण्यासाठी प्रयत्न करणारे आमदार बबनराव घोलप यांनाच वाकचौरेंच्या विरोधात लोकसभेची उमेदवारी देण्याचा आग्रह शिवसैनिकांनी पक्षाकडे धरला आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात 2009 मध्ये उमेदवाराचा शोध सुरू झाल्यानंतर परिचयातील वाकचौरें यांच्या नावाचा प्रस्ताव घोलप यांनी त्या वेळी शिवसेनाप्रमुखांसमोर ठेवला होता. शिवसेनाप्रमुखांनी तत्कालीन परिस्थितीचा अंदाज बांधून वाकचौरें यांना उमेदवारी दिली. शिवसेनेला विजयी भेट देण्यासाठी शिवसैनिकांसह घोलप यांच्या पर्शिमांना यश आले. शिर्डीत 2014 मध्ये वाकचौरेंंना पुन्हा उमेदवारीचा विचार सुरू असतानाच त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकविण्यासाठी आमदार बबनराव घोलप यांनाच उमेदवारी द्यावी, असा आग्रह शिवसैनिकांनी धरला आहे.

घोलप यांना अपयश
आमदार घोलप यांनी माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना शिवसेनेत आणण्यासाठी प्रयत्न केले. पक्षाने दोघांचा योग्य सन्मान करून केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळात समावेश केला. मात्र, कालावधी पूर्ण झाल्यानंतर दोघेही स्वगृही परतले. वाकचौरें यांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवल्याने दुसर्‍यांना पक्षात आणणार्‍यांना पक्षातच ठेवण्यात घोलप अपयशी ठरले आहेत.

भाजप नेत्याचे साकडे
दरम्यान, शिर्डीतील भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने शिष्टमंडळासह शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हा मतदारसंघ भाजपला सोडण्यासाठी साकडे घातल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाची शिवसेना-भाजपमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पक्षप्रमुखांचा आदेश शिरसावंद्य
सन 2009 च्या निवडणुकीत शिवसैनिकांसोबत भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयासाठी महिनाभर पर्शिम घेतले होते. तरीही त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. त्यांना धडा शिकविण्यासाठी पक्षाकडे माझ्या नावाचा आग्रह धरला आहे. मात्र, शिवसेनेत पक्षप्रमुखांचा आदेश अंतिम असल्याने त्यांचा निर्णय मान्य असेल. अर्थात, जन्म व कर्मभूमी देवळाली असल्याने प्रथम पसंती देवळालीलाच आहे. बबनराव घोलप, आमदार