आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आचारसंहितेनंतर काढणार वृक्षलागवडीसाठी निविदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे सव्वादोन कोटी रुपयांची वृक्षलागवडीची निविदा रद्द करा, आम्‍ही मोफत वृक्षलागवड करून देतो अशी तयारी दर्शविणा-या निमा या संघटनेबरोबरील पालिकेचा संयुक्त करार बारगळल्यातच जमा आहे. पालिकेच्या अटी मान्य नसल्याचे उद्योजकांनी यापूर्वीच स्पष्ट केल्याने आता त्याचाच आधार घेऊन विधानसभा निवडणुकीनंतर निविदा काढण्यासाठी उद्यान विभागाकडून आयुक्तांना पत्र दिले जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
साधारण तीन महिन्यांपूर्वी महापालिकेच्या उद्यान विभागाने सहाही विभागात वृक्षलागवडीसाठी निविदा काढली. दोन कोटींची तरतुदीतून हाेणारी वृक्षलागवड करण्यामागे उच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा संदर्भ देण्यात आला होता. शहरात माेठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असल्याने त्यासाठी वृक्ष ताेडावे लागत असून, त्या बदल्यात एकास तीन याप्रमाणे वृक्ष लागवड करणे गरजेचे असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, निमा या संघटनेने पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे बघून हा खर्च करण्याऐवजी मोफत वृक्षलागवड करून देण्याची भूमिका घेतली. उद्याेजकांच्या सामाजिक उत्तरदायित्वाचा (सी.एस.आर.) भाग म्हणून पालिका जेथे सांगेल तेथे वृक्ष लावू, असेही त्यांनी सांगितले होते.
या प्रकरणावरून चांगलीच वादावादी झाल्यावर मात्र पालिका आयुक्तांनी निमा पदाधिकाऱ्यांना अटीवर वृक्षलागवडीची परवानगी दिली होती. मात्र, उद्यान विभागाने न्यायालयात पालिकेविरोधात सुरू असलेल्या खटल्यात प्रतियोगी म्हणून येण्याची अट घातल्यानंतर उद्योजकांनी त्यास आक्षेप घेतला. या अटीला विरोध झाल्यानंतर पालिकेकडून कोणतेही सकारात्मक पाऊल वा चर्चेसाठी आमंत्रण गेले नाही. सूत्रांच्या माहितीप्रमाणे उद्योजकांना हे काम देण्याची उद्यान विभागाची मानसिकताच नसून, आचारसंहितेनंतर उद्याेजकांचा प्रतिसाद नसल्याचे कारण देत निविदा काढण्यासाठी परवानगी मिळावी, असे पत्र उद्यान विभागाकडून आयुक्तांना दिले जाणार आहे.
आता वृक्ष लावणार कधी?
निवडणूक आचारसंहितेनंतर वृक्ष लागवडीसाठी निविदा काढली तरी, प्रत्यक्षात झाडे कधी लावणार असा प्रश्न आहे. मुळात पावसाळा संपला असून, अशा परिस्थितीत पुढील पावसाळ्यापर्यंत पालिकेला वाट बघावी लागेल. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशाचे बंधन म्हणून हिवाळ्यातही वृक्ष लागवडीसाठी निविदा काढली जाण्याची शक्यता आहे.