आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुशिक्षित बेरोजगारांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करत थेट नोकरीच्याच संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या चारदिवसीय मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी सेवा आणि मार्केटिंग क्षेत्रातील पाचशे जागांसाठी जवळपास दीड हजार उमेदवारांनी मुलाखत देत मनसेच्या या सामाजिक उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करत विद्यार्थ्यांमध्ये आपल्या पक्षाची छबी उमटविल्यानंतर राज्यातील वाढत्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी मनसेने आता आपला मोर्चा पदवीधर उमेदवारांकडे वळविला आहे. स्थानिकांना रोजगार देण्याचा निर्धार करत मनसे रोजगार -स्वयंरोजगार विभाग आणि मिनर्व्हा एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीने या महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्यात पहिले दोन दिवस विविध कार्यालयीन नोकर्यांसाठी मुलाखती घेण्यात येणार आहे. पुढील दोन दिवस औद्योगिक क्षेत्रातील रिक्त आणि उपलब्ध जागांसाठी मुलाखती होणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन आमदार वसंत गिते व प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांच्या हस्ते झाले. या वेळी नगरसेवक अनिल मटाले, सलीम शेख, गुलजार कोकणी, रोजगार-स्वयंरोजगार विभागाचे शहर संघटक पराग शिंत्रे, जिल्हा संघटक मनोज जोशी, विभाग संघटक कैलास मोरे, किशोर वडजे उपस्थित होते.
क्रेडाईस हवेत सातशे गवंडी-प्लंबर
नामांकित बांधकाम व्यावसायिकांची संस्था असलेल्या क्रेडाईने सहाशे ते सातशे गवंडी आणि प्लंबरची मागणी केली आहे. त्यासाठी मनसे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून कमीत कमी दुसरीपर्यंत शिकलेल्या उमेदवारांसाठी 20 दिवसांचे प्रशिक्षण घेणार आहे. त्यांची परीक्षा घेत प्रमाणपत्र आयटीआय संस्था देणार असल्याचे सभागृहनेते शशिकांत जाधव यांनी सांगितले. जिल्ह्यात 50 हजार गवंडी आणि प्लंबर हवे आहेत. त्यासाठीच हा कोर्स सुरू करण्यात येणार असून, शहरासह जिल्ह्यातून आणि गरज पडल्यास जिल्ह्याबाहेरील उमेदवारांनाही संधी देण्यात येणार असल्याचे जाधव म्हणाले.
आघाडीच्या कंपन्या-संस्थांनी घेतल्या मुलाखती
पहिल्या दिवशी सेवा आणि मार्केटिंग क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक, आयएनजी बँक, फेडरल फायन्शियल कन्सलटन्सी, मेट लाईफ इन्शुरन्स, युरेका फॉब्य्, नेहा प्लेसमेंट, एचडीएफसी बँक, एलआयसी या संस्थांनी मेळाव्यात सहभाग नोंदविला. सोमवारी बीपीओ, आयटीएस, टेलेकॉम या क्षेत्रातील रिक्त जागांसाठी मुलाखती होणार आहे.
आयटी कंपन्यांकडून उद्या मुलाखती
पुण्यातील दोन आयटी (माहिती आणि तंत्रज्ञान) कंपन्या सातशे उमेदवारांची भरती करणार आहेत. या मेळाव्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एकूण सात कंपन्या सहभागी झाल्या आहेत. तसेच बंगळूरू येथील जॉब्ज् राजा कंपनीस कुशल आणि अकुशल आठ हजार लोकांची आवश्यकता आहे. 29 जानेवारी रोजी कंपनीचे अधिकारी मुलाखती घेणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.