आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन सीबीएसला मनसे पदाधिकार्‍यांच्या वाहनांचा ‘घेराव’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नवीन सीबीएसनजीकच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकार्‍यांच्या बैठकीस उपस्थित असलेल्या पदाधिकार्‍यांनी त्यांच्या आलिशान चारचाकी गाड्या सिव्हिलच्या भिंतीनजीक तसेच मनसे कार्यालयाच्या बाजूने अशी दुतर्फा उभी केल्याने मुळातच अरुंद रस्ता अधिकच चिंचोळा होऊन वाहतूककोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला.

नवीन सीबीएसच्या पुढील बाजूस मनसेचे कार्यालय आहे. शनिवारी सकाळी पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीसाठी आलेल्या प्रत्येक पदाधिकार्‍यांनी त्यांची वाहने त्र्यंबक रस्त्यावरून आतमध्ये वळणार्‍या प्रवेशस्थानापासून ते थेट बसस्थानकाच्या प्रवेश आणि बहिर्गमन मार्गावर लावली. त्यामुळे सीबीएसचा मार्गच अरुंद होऊन प्रत्येकवेळी कोणतीही बस बाहेर पडताना किंवा आतमध्ये येताना तो संपूर्ण रस्ताच ब्लॉक होऊन जाण्याचे प्रसंग सातत्याने घडत होते.

एसटी वळायलादेखील झाली अडचण

रस्त्यावर दुतर्फा उभ्या करण्यात आलेल्या वाहनांमुळे या रस्त्यावरुन एकाचवेळी समोरासमोर बस आल्यास संपूर्ण वाहतूकच ठप्प होण्याचे प्रकारदेखील घडले. तसेच बाराच्या सुमारास तर एसटी वळविणेदेखील बिकट बनले होते. अशावेळी दुर्दैवी प्रकार घडला तर त्याची जबाबदारी कुणावर ? असा सवालदेखील त्यानिमित्ताने पुढे आला आहे.

महापौरांचे वाहनदेखील रस्त्यालगतच

महापौर यतिन वाघ यांचे लाल दिव्याचे शासकीय वाहनदेखील नवीन सीबीएसच्या प्रवेशद्वारानजीक लावण्यात आले होते. त्यामुळे जिथे प्रथम नागरिकाचेच वाहन जर रस्त्यानजीक थांबविले असेल, तिथे अन्य पदाधिकार्‍यांना काय दोष देणार ? असेच चित्र दिसून येत होते. मनसेच्या झेंड्याचे चित्र लावलेली वाहने असल्याने कुणी वाहतूक पोलिसदेखील त्यांना शिस्त लावायला पुढे झाला नाही. सामान्य नागरिकांनी अशा प्रकारे वाहने भररस्त्यात लावली असती तर त्यावर त्वरेने कारवाई करणारे, वाहने उचलून नेणारे आता कुठे गेले ? असा सवाल वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांनी केला.