आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘महावितरण’कडून बेरोजगारांची हेळसांड; परीक्षेसाठी केंद्र निवडले नाशिक, मिळाले मात्र मुंबई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महावितरण कंपनीतर्फे कनिष्ठ सहाय्यक पदासाठी 22 आणि 23 फेबुवारीला परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी नाशिकच्या बेरोजगारांनी स्थानिक केंद्राची निवड केली होती. परंतु, महावितरण कंपनीने त्यांना चक्क मुंबई केंद्र दिल्याने कंपनी बेरोजगारांची हेळसांड करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पाच हजारपैकी तब्बल अडीच हजार विद्यार्थ्यांना मुंबई केंद्र मिळाले आहे.

22 व 23 फेब्रुवारीला होणार्‍या कनिष्ठ सहाय्यक पदासाठी अनेक उमेदवारांनी परीक्षा देण्यासाठी ऑनलाइन अर्ज केले होते. अर्जावर परीक्षा केंद्र निवडण्यासाठी असलेल्या पर्यायामध्ये नाशिक केंद्रही होते. अनेकांनी नाशिक केंद्राची निवड केली. मात्र, महावितरणकडून या उमेदवारांना नाशिक केंद्र न मिळता मुंबई केंद्र मिळाले. त्यामुळे या उमेदवारांची गैरसोय होणार असल्याने त्यांनी महावितरणच्या मुख्य कार्यालयात चौकशी केली असता तेथील कर्मचार्‍यांनी उद्धट उत्तरे देऊन समाधान केले, तर नाही मात्र बेरोजगारांचे मानसिक खच्चीकरण कसे होईल, याकडे अधिक लक्ष दिले.

दरम्यान, नाशिकमध्ये संदीप फाउंडेशन येथे 22 आणि 23 फेब्रुवारीला कनिष्ठ सहाय्यकची परीक्षा होणार आहे. त्यासाठी तीन सत्रे असून, प्रत्येक सत्रात 804 उमेदवार परीक्षा देणार आहेत. 22 फेब्रुवारीला सकाळ आणि दुपार सत्रात, तर 23 ला फक्त सकाळ सत्रात परीक्षा होणार आहे.

जागांनुसार नियोजन
या परीक्षेसाठी पाच हजार 851 ऑनलाइन अर्ज आलेले आहेत. परीक्षा ऑनलाइन होणार असल्याने उपलब्धतेनुसार नाशिकला दोन हजार 412 उमेदवारांची परीक्षा ठेवली आहे. उर्वरित उमेदवारांपैकी 705 जणांची पुणे, तर दोन हजार 739 जणांची मुंबई येथे सोय करण्यात आली आहे. राम दोतोंडे, मुख्य व्यवस्थापक, सांघिक संवाद, महावितरण