आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एमटीडीसी’ बसविणार 100 किऑस्क यंत्रे; पर्यटनस्थळांची माहिती त्वरित होणार उपलब्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राज्यातील विविध पर्यटनस्थळांचा प्रचार, प्रसार करतानाच पर्यटनाला चालना देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी तब्बल 100 किऑस्क यंत्रे बसविण्याचा निर्णय प्रादेशिक पर्यटन विभागातर्फे घेण्यात आला आहे. या टचस्क्रीन यंत्रांद्वारे राज्यातील पर्यटनस्थळे, तेथे जाण्याचे मार्ग अशी विविध प्रकारची माहिती त्वरित उपलब्ध होणार आहे. राज्यातील काही मुख्य जिल्ह्यांमध्येदेखील 300 यंत्रे महिनाभरात बसविण्यात येतील.

महाराष्ट्र पर्यटनस्थळांनी अत्यंत समृद्ध आहे. त्यामुळे राज्यातील दुर्लक्षित पर्यटनस्थळांची ओळख पर्यटकांना करून दिल्यास अशा स्थळांचा विकास होणे शक्य आहे. ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी पर्यटनस्थळांचे ‘मार्केटिंग’ करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास महामंडळाने किऑस्कची संकल्पना आणली आहे.

आगामी सिंहस्थात नाशकात येणारे लाखो भाविक, तसेच जगभरातून येणार्‍या पर्यटकांचा विचार करून किऑस्क यंत्रे इंटरनेटद्वारे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यावर मराठी व इंग्रजी भाषेतून ‘एमटीडीसी’चे संकेतस्थळ उपलब्ध राहणार आहे. परिणामी राज्यातील पर्यटनस्थळे, तेथे जाण्याचे मार्ग, ‘एमटीडीसी’चे रिसॉर्ट, तेथील आरक्षणासह विविध माहिती पर्यटकांच्या पुढय़ात येणार आहे.

येथे बसविणार यंत्रे
जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्वेस्थानक, बसस्थानक या ठिकाणी किऑस्क यंत्रे बसविणे प्रस्तावित आहे. नाशकातील प्रादेशिक पर्यटन विकास महामंडळाचे कार्यालय, भंडारदरा येथील रिसॉर्टचे कॅन्टीन, स्वागत कक्ष, शिर्डी येथील कॅन्टीन, साई संस्थानचा स्वागत कक्ष, त्र्यंबकेश्वर येथील रिसॉर्ट, जळगाव येथील रिसॉर्ट व हॉटेल टुरिस्ट येथेदेखील ही यंत्रे महिनाभरात कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

माहिती टचस्क्रीनद्वारे पर्यटकांना उपलब्ध
राज्यासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या प्रचारासाठी सार्वजनिक ठिकाणी किऑस्क यंत्रे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी राज्यातील पर्यटनस्थळे, तेथे जाण्याचे मार्ग व इतर पूरक माहिती या टचस्क्रीन यंत्रांद्वारे पर्यटकांना त्वरित उपलब्ध होणार आहे. के. एस. कुटाळे, प्रादेशिक पर्यटन विकास महामंडळ