आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation Education Comity Dissolve

नाशिक महापालिका शिक्षण मंडळ अखेर बरखास्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नाशिक- महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण अधिनियमान्वये शासनाने प्रस्तावित केल्याप्रमाणे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारितील शिक्षण मंडळ व समित्या विसर्जित केल्या आहेत. त्यासंदर्भात 13 जून रोजी शासनाने राजपत्र प्रसिद्ध केले आहे. वर्षभरापूर्वी नाशिक महापालिकेने राजकीय पक्षांनी सुचविलेल्यानुसार शिक्षण मंडळावर 13 सदस्यांची निवड केली होती.

काही महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यातील शाळा व मंडळांच्या समित्या बरखास्तीचा निर्णय शासनाने ‘शिक्षणाचा हक्क’ या अध्यादेशानुसार घेतला होता. त्यामुळे शासन नेमके काय निर्णय घेणार, याविषयी मंडळावर नियुक्त सदस्यांमध्ये भीती होती. आता शासनाने थेट यासंदर्भात राजपत्रच प्रसिद्ध केल्याने व त्यात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण अधिनियमान्वये गठित शिक्षण मंडळे, स्थानिक व इतर समित्या किंवा मंडळे विसर्जित होतील तसेच त्यातील सदस्य आपली पदे रिक्त करतील, असे म्हटले असून, शिक्षण मंडळ व समित्यांकडील स्थावर मालमत्ता आणि त्यातील अटी- शर्ती व र्मयादा हे सर्व स्थानिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित होतील, असेही म्हटले आहे. पालिकेने वर्षभरापूर्वी शर्वरी लथ, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब कोकणी, प्रभाकर पाळदे, संजय खैरनार, बाबूराव आढाव, माणिक सोनवणे, जय कोतवाल, मोहन मोरे, बबलू हाजी, खलिफ पटेल, संदेराव आदींची नियुक्ती मंडळावर केली होती.

राजपत्रातील महत्त्वाच्या बाबी
> शिक्षण मंडळाच्या सेवेतील कर्मचार्‍यांचे प्राधिकरणात हस्तांतरण
> कर्मचार्‍यांचे वेतन व सेवा याबाबत धोरण पूर्वीसारखेच राहणार
> भविष्यनिर्वाह निधी, निवृत्तिवेतन स्थानिक प्राधिकरणाकडे
> शाळांना देय अनुदाने व भाडे शासन देणार
> प्राथमिक शिक्षण निधी स्थानिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित
> शाळांचा अर्थसंकल्प प्राधिकरणच बनविणार
> शाळा तपासणी व नियंत्रण आयुक्तांच्या अधिकारात
> शाळा व कर्मचार्‍यांची अपिले प्राधिकरणापुढेच सुरू राहणार