आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक डायरी: सेनेतील बंडाळी रोखणार कोण?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या निवडणुकीत सत्तेवर येण्यासाठी आघाडी आणि युतीला 55 नगरसेवकांची जुळवाजुळव करावी लागली होती. अर्थात ही आकडेमोड करण्यात युतीतील मुख्य घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला यश आले. सत्तास्थापनेसाठी सेनेला अन्य पक्षांच्या 15 नगरसेवकांचा आधार घ्यावा लागला होता. पहिल्या अडीच वर्षांच्या काळात या सर्वच पक्षांनी मैत्रीचा हात पुढे केल्याने सेनेची सत्ता आली. परंतु माजी महापौर विनायक पांडेंनंतर पुढील अडीच वर्षांच्या काळात बसपाच्या नगरसेविका कविता कर्डक, ज्योती शिंदे आणि सुजाता काळे यांनी ऐनवेळी सभागृहात तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. याच पडत्या काळात नगरसेवक प्रताप मेहरोलिया यांनी सेनेच्या बाजूने मतदान करीत रीतसर सेनेत प्रवेशही केला. शिवसेनेला मदत केलेल्यांपैकी सुधाकर बडगुजर, गोवर्धन गौड, संजय नवले, भगवान भोगे आणि त्यांची कन्या नगरसेविका रिमा भोगे यांनीही सेनेत प्रवेश केला. मदतीचा हात पुढे करणा-यांनी थेट पक्षात प्रवेश केल्याने या सर्वांनाच सेनेने आश्वासने देऊन आपलेसे करून घेण्याचा प्रयत्न केला. विद्यमान नगरसेवक संजय नवले हे तसे अगोदरपासूनच सेनेचे. मात्र गेल्या निवडणुकीत त्यांच्याऐवजी वसंत पाटील यांना उमेदवारी दिल्याने नाराज नवलेंनी अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळवला. आता याच नवलेंना स्टॅँडिंग उमेदवार असूनही पुन्हा डावलण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. नवले यांना शह देण्यासाठी सेनेतीलच काही पदाधिका-यांनी दुस-या एका उमेदवाराला पुढे केले आहे. असाच काहीसा प्रकार माजी नगरसेवक प्रभाकर पाळदे यांच्याविषयी मागील निवडणुकीत झाला होता. आगामी निवडणुकीसाठी स्थायी समितीचे विद्यमान सभापती रणजित नगरकर आणि प्रताप मेहरोलिया या दोघांनीही प्रबळ दावेदारी सुरू केली आहे. नाशिकची महापालिका सेनेचा बालेकिल्ला असूनही शिवसेनेला अन्य मित्रपक्षांच्या कुबड्यांचा आधार याच काळात घ्यावा लागला होता. यावरून सेनेतील अंतर्गत सुंदोपसुंदीची कल्पना येऊ शकते. या घटनांची पुनरावृत्ती आगामी निवडणुकीत होऊ नये यासाठी खबरदारी घेणे तर दूरच, परंतु अंतर्गत कलहच अधिक वाढला आहे. येत्या निवडणुकीसाठी संपर्कप्रमुख म्हणून अरविंद सावंत हे काम पाहत आहेत. संपर्कप्रमुख बदलूनही स्थानिक नेत्यांमधील मतभेद वाढतानाच दिसत आहेत. अवघ्या महिनाभरावर निवडणुका येऊन ठेपल्याने कार्यकर्त्यांसह सर्वच पदाधिकाºयांना विश्वासात घेण्याची आवश्यकता असताना सेनेच्या बहुतांश बैठका या मोजक्या पदाधिकाºयांना सोबत घेऊन तारांकित हॉटेलांमध्ये होत आहेत. यामुळे अविश्वासाचे मळभ सेनेभोवती जमा झाले आहे. सेनेप्रमाणेच अन्य पक्षांमध्येही हेच सुरू आहे. सध्याचे संपर्कप्रमुख काही ठरावीक पदाधिकाºयांच्याच चक्रव्यूहात अडकल्याची चर्चा आहे. सेनेतील स्थानिक पदाधिकाºयांमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर फूट पडण्याचा धोका वाढला आहे. याचीच परिणती म्हणून सेनेला पडत्या काळात आधार दिलेल्यांचाच पत्ता कट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सेनेचे विद्यमान आमदार बबनराव घोलप यांचे पुतणे राजू घोलप यांनीही पुन्हा एकवार संपूर्ण तयारीनिशी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या निवडणुकीचा अनुभव पाहता तिकीट न मिळाल्यास बंडखोरीचीही त्यांची तयारी असू शकते. लोजपामधून सेनेत दाखल झालेल्या भगवान भोगे यांना महापालिकेतील प्रवक्ते म्हणून सेनेने पद बहाल केले. परंतु हे पद केवळ शोभेचे बाहुले ठरले. कारण स्थानिक पदाधिकारी आणि महापालिकेतील सेनेच्या पदाधिकाºयांनी भोगे यांना कधीच जवळ केले नाही. म्हणूनच सभागृहात त्यांना एकाकी पाडण्याचे अनेकदा प्रकार झाले. अशा प्रकारे सेनेत नव्याने आलेल्यांची कोंडी होत असल्याने अस्वस्थता वाढली आहे. सलग दोन वेळा भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले माजी उपमहापौर अजय बोरस्ते यांनी सेनेत प्रवेश केला आणि पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर थेट महानगरप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली. परंतु इथेही त्यांना नाकापेक्षा मोती जड नको म्हणून स्थानिक पदाधिका-यांकडून डावलण्याचा प्रयत्न केला गेला. आता बोरस्तेंना आपल्या मार्गातून हटवण्यासाठी प्रभाग 14 मधील दोन्ही जागा भाजपला सोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एकेकाचा काटा काढण्याच्या प्रकारामुळे शिवसेनेतील वातावरण तापले आहे. येणा-या निवडणुकीत सर्वच पक्षांत बंडाळी होणार आहे. पण त्यातल्या त्यात सर्वाधिक बंडाळी सेनेत होऊ शकते हे मात्र नव्याने सांगायला नको.