नाशिक - महापालिकेच्या उत्कंठावर्धक निवडणुकीत एकहाती सत्ता खेचत १२२ पैकी भाजपने ६६ जागांवर दणदणीत विजय संपादन केला असून, महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळविण्याचा विक्रमही या पक्षाने नोंदविला आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेनेला ३५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.
सत्ताधारी मनसेची अवस्था दारुण झाली. या पक्षाचा आकडा ४० वरून ५ पर्यंत घसरला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचादेखील धुव्वा उडाला असून, राष्ट्रवादीचे २० वरून ६, तर काँग्रेसचे १४ वरून ६ नगरसेवक शिल्लक राहिले. अन्य छोट्या पक्षांनाही नाशिककरांनी साफ नाकारले आहे, तर केवळ चार ठिकाणीच अपक्षांची सरशी झाली आहे.
गेल्या महापालिका निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांत सर्वात पिछाडीवर असलेल्या भाजपने स्पष्ट बहुमत रचून एकप्रकारे विक्रमच रचल्याचे चित्र अाहे. पालिका निवडणुकीचे मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्या दहा प्रभागांत पहिल्या फेरीपासून भाजपची अाघाडी हाेती. पहिल्या ४० जागांमध्ये भाजपने २२ जागा जिंकून निर्विवाद सत्तेच्या दिशेने प्रवास सुरू केला. १२२ जागांवरील मतमाेजणी पूर्ण झाल्यानंतर भाजपने ६६ जागा जिंकून महापाैरपदासाठी अावश्यक ६२ या मॅजिक फिगरचा अाकडा पूर्ण केला.
दरम्यान, दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना असून, गेल्यावेळच्या तुलनेत १९ वरून ३५ जागा मिळाल्या खऱ्या, मात्र शिवसेनेला हुकमी असलेल्या जवळपास १४ ते १५ जागांवर पराभव स्वीकारावा लागला. महापालिकेतील सत्ताधारी असलेल्या मनसेला ४० मधील जवळपास ३० नगरसेवकांनी साेडचिठ्ठी दिल्यानंतर अखेरच्या क्षणी महत्त्वाची कामे केल्यामुळे तसेच तडाखेबंद भाषणामुळे मनसेला १२ ते १४ जागा मिळतील, अशी अपेक्षा हाेती.
प्रत्यक्षात मनसेने त्यातही निम्म्या जागा गमवल्या असून, त्यांना ५ जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचाही धुव्वा उडाला असून, त्यांना २० वरून ६ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसने मात्र प्रतिकूल परिस्थितीत १५ पैकी ६ जागा मिळवत महत्त्वाच्या ठिकाणी विजय मिळवला. माकप, रिपाइं यंदाच्या निवडणुकीत साफ झाले.
नाशिकचा सर्वांगीण विकास करून दाखवू
विकास, पारदर्शकता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास ठेवत भाजपला स्पष्ट बहुमत दिल्याने मी नाशिककरांचे आभार मानतो. मुख्यमंत्र्यांनी शहर दत्तक घेतले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकचा सर्वांगीण विकास करून दाखवू. एक आदर्श शहर म्हणून नाशिकची ओळख करण्यावरच आमचा भर राहील - गिरीश महाजन, पालकमंत्री.
विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
नाशिककरांनी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री महाजनांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचा ध्येयनामा तयार करून जाहीरनाम्याच्या रूपाने सादर केला. यावर जनतेने विश्वास दाखविल्याने मतदारांचे आभार मानतो. त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. स्मार्ट सिटीच्या रूपाने नाशिकचे नाव देशाच्या नकाशावर झळकेल - बाळासाहेब सानप, अामदार तथा शहराध्यक्ष, भाजप.
नाशिक: मनसेचे इंजिन यार्डात, भाजपने मिळवला ‘सत्तेचा कुंभ’
नाशिकला दत्तक घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घाेषणेला मतदारांनी भरभरून प्रतिसाद देत तब्बल ६६ जागांवर उमेदवार निवडून दिले. सत्ताधारी मनसेला भुईसपाट करण्याबराबेरच शिवसेनेच्या बालेकिल्लयात भाजपने जाेरदार मुसंडी मारली अाहे. तिकिट देण्यासाठी पैसे मागितल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने भाजपसाठी नाशिक निवडणूक आव्हानाची ठरली होती. शिवसेना-भाजप संघर्ष नाशकातही दिसून आला. गेल्या निवडणूकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यानी विकासाचे दाखविलेले स्वप्न बघून त्यांचे सर्वाधिक ४० जागा नाशिकरांनी निवडून दिल्या हाेत्या. दरम्यान ठाकरे यांचा करिष्मा कमी हाेत गेल्याने व ठाेस विकासकामे न झाल्याने त्यांच्याच पक्षातील ३०हून अधिक नगरसेवकांनी सेना-भाजपाची वाट धरली हाेती. याच नगरसेवकांच्या बळावर भाजप आणि शिवसेनेने विजयी पताका फडकवली. ६७ जागांसह भाजप पहिल्या तर ३४ जागांसह शिवसेना दुसऱ्या ठिकाणी आहे.
राष्ट्रवादीचीही जादू ओसरली, काँग्रेसलाही फटका
सध्या तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या वर्चस्वात राष्ट्रवादी काँग्रेसला नाशकात चांगले दिवस होते. मात्र, लागोपाठच्या आरोपांमुळे नाशकात राष्ट्रवादीची पुरता पिछेहाट झाली. त्यांना यंदा तब्बल १४ जागांचा फटका बसला. पाचच जागी विजय मिळवता आला. तर, काँग्रेसच्याही ९ जागा घटून केवळ ६ नगरसेवकच निवडून
आले.