आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - महापालिकेत सत्तास्थापनेसाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाची धास्ती घेऊन मनसेने आपल्या चाळीस नगरसेवकांना गुरुवारी दुपारी एका आरामबसने अज्ञात स्थळी रवाना केले आहे. दगाफटका होऊ नये यासाठी पक्षाचे सरचिटणीस आमदार वसंत गिते व वरिष्ठ पदाधिका-यांनीही त्यांच्यापाठोपाठ उशिराने कूच केली.
गेल्या दोन दिवसांपासून पालकमंत्री भुजबळ यांनी नाशिक महापालिकेत सत्तास्थापनेसाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. महापौरपदाचे गाजर दाखवत रिपाइंला ऑफर दिल्यानंतर रिपाइंची प्रतिक्रिया पाहता इतर पक्षांना धक्के देण्यास राष्ट्रवादीने सुरुवात केल्याचा अंदाज येतो. त्यांनी अपक्ष उमेदवारांशी बोलणी सुरू केली असून काही अपक्ष उमेदवारांनी भुजबळांच्या मुंबईस्थित निवासस्थानी तळ ठोकला आहे. तसेच मनसेच्या उमेदवारांशीही दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात येत असल्याची चर्चा आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसे आमदार वसंत गिते यांनी गुरुवारी पक्षाच्या सर्व उमेदवारांना स्वत:च्या निवासस्थानी बोलावून घेतले. 22 नगरसेविका व 18 नगरसेवक अशा मनसेच्या एकूण 40 नगरसेवकांना त्यांनी एका खासगी आरामबसने अलिबागकडे रवाना केले. अनेक नगरसेवकांनी बसऐवजी स्वत:च्या गाडीने जाण्याची इच्छा प्रकट केली, परंतु त्यांच्या मागणीला पक्षाच्या नेत्यांनी दाद न देता त्यांना बसमध्ये बसण्यास भाग पाडले.
गटनोंदणी पूर्ण - सहलीवर जाण्यापूर्वी सायंकाळी पाचच्या सुमारास ही बस प्रथम नाशिक रोड येथील महसूल आयुक्त कार्यालयात नेण्यात आली. गट नोंदणीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर सर्व नगरसेवक अलिबागकडे रवाना झाले. सत्तास्थापनेची गणिते जोपर्यंत जुळत नाहीत तोपर्यंत या नगरसेवकांना नाशिकमध्ये आणण्यात येणार नसल्याचे मनसेच्या सूत्रांनी सांगितले.
नाशिक महापालिकेत महापौर मनसेचा होणार - राज ठाकरे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.