आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'विठ्ठला' कोणता झेंडा घेऊ हाती..? नाशिकमध्ये पक्षांतराचे वादळ..!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक महापालिका निवडणूक अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपल्याने सर्व पक्षांतल्या तसेच स्वतंत्रपणे निवडणूक लढवू इच्छिणार्‍यांचे अमाप पीक आले आहे. पाच वर्षे नाशिककरांची 'सेवा' करण्यासाठी प्रत्येक पक्ष आतुर झाला असला तरी सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांची महत्त्वाकांक्षा व स्वार्थामुळे निष्ठा बदलत चालली आहे. पद, उमेदवारी मिळणार नसली तर क्षणाचा विचार न करता पक्षांतर करणार! असाच जवळजवळ सर्वच पक्षांमधून सूर निघत आहे. पूर्वी केवळ पक्षाचे कार्य करण्यावर भर दिला जात होता. फळाची अपेक्षा केली जात नव्हती. आतापर्यंत जवळपास डझनभर कार्यकर्त्यांनी कुंकू बदलले आहे.
महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच नाशिक शहरात पक्षांतराचे वादळ उठले आहे. प्रत्येकाला उमेदवारीची घाई झाली असून, त्यासाठी प्रत्येक जण ‘विठ्ठला...कोणता झेंडा घेऊ हाती!...' अशा संभ्रमावस्थेत वावरतो आहे. कार्यकर्त्यांच्या या बदलत्या भूमिकेमुळे पक्षांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पक्षांतराच्या वादळाला केवळ कार्यकर्तेच जबाबदार नसून पक्ष ही तेवढेच जबाबदार आहे, असा दबका सूरही प्रत्येक वार्डातून निघत आहे. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख केशवराव थोरात यांच्या कुटुंबातील उदय थोरात यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करून भारतीय जनता पक्षाचे 'कमळ' हाती घेतले आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नगरसेवक संतोष साळवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे पदाधिकारी वाल्मीक बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सदस्य बाबूराव आढाव यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये तर राष्ट्रवादीचे संजय पागेरे यांनी मनसेत प्रवेश केला. भाजपाचे माजी मंडल अध्यक्ष जयंत नारद यांनी पक्षाला श्रीराम म्हणत शिवसेनेत प्रवेश केला. तर अपक्ष नगरसेवक सुनील बोराडे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला.
पक्षांतराच्या वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता...
प्रत्यक्षात उमेदवारी वाटपाची सुरुवात झाल्यानंतर पक्षांतराचे वादळ येणार असल्याचे हे संकेत आहेत. व्दिसदस्य पध्दतीमुळे प्रत्येकाला निवडणूक सोपी व विजयाचा विश्वास वाटत असल्याने उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे प्रत्येक विभागात एका जागेसाठी चारपेक्षा अधिक इच्छुक आहेत. त्यापैकी एकालाच उमेदवारी मिळणार असल्याने आपल्याला उमेदवारी मिळणार नाही असे संकेत मिळताच कार्यकर्ते पक्षांतराचा मार्ग अवलंबत असल्याने दिवसागणिक पक्षांतराचे सत्र वाढत आहे.
सेना-भाजप युती अधांतरी लटकली...
निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर एकीकडे पक्ष कार्यालये गजबजू लागली आहेत. तर दुसरीकडे मात्र शिवसेना आणि भाजपमधील युती अधांतरी लटकली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील इच्छुकांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. नाशिक महापालिका निवडणुकीकरिता युती करण्यासाठी गेल्या दोन आठवड्यांपासून शिवसेना- भाजपमध्ये खल सुरू आहे. दोन्ही पक्षांतील पदाधिकार्‍यांमध्ये सुरु असलेल्या आरोप- प्रत्यारोपामुळे अद्याप यावर तोडगा निघू शकलेला नाही. भाजपने आरंभापासूनच स्बबळावर लढण्‍याची भाषा केली होती. भाजपच्या तुलनेत शिवसेना मात्र 'बॅकफुट'वर असल्याचे चित्र दिसत आहे. मध्यंतरी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी नाशिक महापालिकेसाठी युती करण्याचे आदेश दिले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीही भाजप पदाधिकार्‍यांशी चर्चा करून युतीसाठी अनुकूलता दर्शवली. सर्वाधिक नगरसेवक असतानाही युतीचा धर्म पाळण्याचा प्रयत्न शिवसेनेचे पदाधिकारी करीत असले तरी, त्याला भाजपच्या काही पदाधिकार्‍यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे सेनेच्या गोटातून बोलले जात आहे.
महापालिका निवडणुकीकरिता युती करण्याचा निर्णय भाजपमुळेच लांबणीवर पडत असल्याचा दावा करीत यासंदर्भातील वस्तुस्थिती अवगत करणारा एक अहवाल सेनेच्या पदाधिकार्‍यांनी मातोश्रीवर पाठवून दिला आहे. भाजपकडून प्रतिसाद न मिळाल्यास युतीबाबत कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या आठवडाभरात शिवसेना व भाजप पदाधिकार्‍यांची किमान दोनदा एकत्र बैठक घेण्याचे ठरले होते. परंतु अद्याप या बैठकीला मुहूर्त मिळू शकलेला नाही. शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरविंद सावंत हेदेखील नाशिकमध्ये मुक्काम ठोकून आहेत. मात्र त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी भाजपच्या गोटातून कोणीही पुढे येत नसल्याचे कळते. हे प्रकरण आता मातोश्रीच्या कानावर गेल्याने युतीबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेत हातावर हात ठेऊन भाजपच्या प्रतिसादाची वाट पाहत बसले आहे. नाशिक महापालिकेवर युतीची महापालिकेवर सत्ता असून, सत्ता कायम ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. प्रामुख्याने युतीसमोर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मोठं आव्हान असणार आहे. शिवसेना व भाजप युतीतील विद्यमान नगरसेवकही मनसेच्या तंबूत गेल्यामुळे पक्षविरोधी वातावरण निर्माण झाले आहे.
मनसे आघाडीवर...
उमेदवारी अर्ज विक्री सुरू झाल्यानंतर मनसेकडून तब्बल एक हजार इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत. मनसेच्‍या तिकीटासाठी इच्‍छुक असलेल्‍या परीक्षार्थींची राज ठाकरे यांनी मुलाखती घेतल्‍या. प्रत्‍येक उमेदवाराची राज यांनी मुलाखत घेतली. परंतु, राज यांनी पुरेसा वेळ दिला नाही, असाही नाराजीचा सुर मनसेच्‍या गोटातून निघत आहे. मनसेनंतर शिवसेनेकडून इच्छुकांनी मोठय़ा प्रमाणात अर्ज घेतले आहे. आतापर्यंत 560 अर्ज नेले असून, मुलाखतीच्या प्रक्रियेपर्यंत अर्ज वितरण होणार असल्यामुळे इच्छुकांची मोठी संख्या निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपकडून स्वबळावर लढण्याची भाषा केली जात असली तरी, अर्ज घेणार्‍यांची संख्या मात्र कमी दिसत आहे. जेमतेम 175 अर्जांची विक्री झाली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून जवळपास 350 इच्छुकांनी अर्ज घेतले आहे तर कॉँग्रेसकडून 200 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले आहे.
(sandip.p@dainikbhaskar.com)