आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation Enchroachment Issue

अतिक्रमणाबाबत पोलिसांचा महापालिकेला अजब सल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईत अडथळा आणणार्‍यांवर कारवाई करण्याचे सोडून मोहिमेला विरोधक करणार्‍यांसमवेत बैठक घेण्याचा अजब सल्ला नाशिकरोड पोलिसांनी दिला आहे. वरिष्ठ निरीक्षक एम. एम. बागवान यांनी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त दत्तात्रय गोतिशे यांच्या या आशयाच्या पत्राची प्रशासनात चर्चा आहे.

जेलरोड परिसर अतिक्रमणमुक्त व्हावा, यासाठी या भागातील सर्व नगरसेवकांसह सामाजिक संस्थांकडून महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. अतिक्रमण निर्मूलनाची ही मोहीम यशस्वी होण्यासाठी महापालिकेला तत्काळ पोलिस बंदोबस्त देण्याऐवजी, अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या विरोधकांनाच एकप्रकारे पाठबळ देऊन त्यांचे महत्त्व विनाकारण वाढविण्याबरोबरच परिसर अतिक्रमणमुक्त करण्यातही आडफाटा आणण्याचा हा प्रकार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी महापालिकेला दिलेल्या या लेखी सूचनेमुळे आता नेमकी कोणती भूमिका घ्यावी, असा प्रश्न पालिकेला पडला आहे. पालिका कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पोलिसच तयार करतात मोहिमेचे विरोधक
शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण आहे. ते हटविताना विरोध होतोच. जेथे विरोध होणार नाही तेथे पोलिस विरोधक तयार करण्याचे काम करत आहेत. यापेक्षा अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यासाठी पुरेसा बंदोबस्त महापालिकेला उपलब्ध करून दिल्यास शहर लवकर अतिक्रमणमुक्तहोईल.
-अशोक सातभाई, नगरसेवक

पोलिसांचा सल्ला
नाशिकरोड परिसरातील जेलरोडवरील के. एन. केला हायस्कूललगत व फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिका, पोलिस, अतिक्रमणधारक व विरोध करणार्‍या नेत्यांसोबत एकत्रित बैठक घेऊन याबाबत महापालिकेच्या अधिकार्‍यांनी उचित निर्णय घ्यावा. त्यामुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
-एम. एम. बागवान, वरिष्ठ निरीक्षक, नाशिकरोड पोलिस ठाणे

अतिक्रमित जेलरोड
जेलरोडवरील इंगळेनगर ते पुरुषोत्तम शाळा तसेच ठिकठिकाणच्या अनधिकृत टपर्‍या हटवून त्यांना के. एन. केला हायस्कूलच्या मागील बाजूच्या मैदानात स्थलांतरित करण्यासाठी प्रभाग सभापती पवन पवार यांनी प्रयत्न केले. मात्र, त्या मोहिमेस विरोध झाला. विक्रेत्यांना दमदाटी, त्यांच्या साहित्याचे नुकसान, चोरीमुळे विक्रेते स्थलांतरित बाजाराऐवजी रस्त्यावर बसू लागले. अतिक्रमण करून व्यवसाय करणार्‍यांवर कारवाईचे आश्वासन देऊनदेखील पालिकेने पोलिस बंदोबस्त नसल्याने मोहीम राबवली नाही. अखेर पवार यांना माघार घ्यावी लागली.

झोपड्यांचे अतिक्रमण ‘जैसे थे’
के. एन. केला शाळेच्या कंपाउंडलगत असलेल्या अनधिकृत झोपड्या हटविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या झोपड्या हटविण्यास विरोध झाला. या कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त देत नसल्याने पालिकेने गेल्या महिन्यापासून कारवाई स्थगित ठेवली आहे.