आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एसटीपी’च्या चौकशीचे आदेश; डॉक्टर व गटनेत्यांची समिती नेमणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पालिकेच्या मलजलनिस्सारण केंद्रांच्या (एसटीपी) कारभाराच्या चौकशीसह त्यातून प्रक्रिया करून बाहेर पडणार्‍या पाण्याची तपासणी करण्याबरोबरच महापालिका रुग्णालयांची पाहणी करण्यासाठी डॉक्टर आणि गटनेत्यांची समिती स्थापन करण्याचे आदेश महापौर अँड. यतिन वाघ यांनी शुक्रवारी महासभेत दिले. बिटको रुग्णालयाचा अहवालही तातडीने सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.

महिला व बालकल्याण समितीसाठी उपआयुक्त दर्जाच्या अधिकार्‍याची नेमणूक आणि जननी शिशुसुरक्षा योजनेकरिता स्वतंत्र निधीची तरतूद करण्यासाठी सभापती मनीषा हेकरे, देवयानी फरांदे, कविता कर्डक, अश्विनी बोरस्ते यांच्यासह महिला सदस्यांनी एकजूट होत आवाज उठवताच महापौर वाघ व आयुक्त संजय खंदारे यांनी ही मागणी तत्काळ मान्य केली. महापालिका रुग्णालयांमध्ये ठेकेदारामार्फत सुरक्षारक्षक नेमणूक करण्यास विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, गटनेता गुरुमित बग्गा, सदस्य शिवाजी सहाणे, तानाजी जायभावे यांनी विरोध करत पालिकेने नियुक्तीची मागणी करत कर्मचार्‍यांच्या आवश्यकतेनुसारच तात्पुरती नेमणुकीची सूचना केली. त्यावर महापौरांनी दोन महिन्यांची मुदतवाढ देत तातडीने भरतीप्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले.

‘एसटीपी’मुळे प्रदूषणात वाढ : तपोवनातील मलजलनिस्सारण केंद्र देखभाल दुरुस्तीसाठी 66 लाख रुपयांच्या प्रशासकीय मंजुरीचा विषय सादर होताच सदस्य उद्धव निमसे यांच्यासह सदस्यांनी विरोध करत एसटीपी प्लान्टमधून सोडण्यात येणार्‍या पाण्यावर योग्य प्रक्रिया केली जात नसल्यानेच गोदा प्रदूषणात वाढ होत आहे. या केंद्रांवर पुरेसे कर्मचारी नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यावर महापौर वाघ यांनी केंद्रांवर नियुक्त असलेल्या कर्मचार्‍यांची हजेरी व भविष्यनिर्वाह निधीविषयीची माहिती सादर करून तेथील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करून अहवाल सादर करावा. तसेच, या सर्व बाबींचा समावेश प्रस्तावात करून सादर करण्याचे आदेश दिले.

समिती करणार पाहणी : इंदिरा गांधी, झाकिर हुसेन व स्वामी सर्मथ रुग्णालयांसाठी कलर डॉपलर मशीन खरेदीचा विषय येताच नाशिकरोडच्या सदस्यांनी बिटको रुग्णालयासाठीदेखील मशीन खरेदीची मागणी केली. त्यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. बी. पाटील यांनी बिटको रुग्णालयात मशीन असल्याचे सांगताच सदस्य चिडले.

डॉ. पाटील हे खोटे बोलत असून, उडवाउडवीची उत्तरे देत असल्याच्या अनेक घटनाच पूर्व विभागाच्या सभापती समीना मेमन, सदस्य कन्हय्या साळवे, रंजना पवार, दिनकर पाटील, समाधान जाधव यांनी सभागृहात मांडल्या व त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. आकाश छाजेड यांनी झाकिर हुसेन रुग्णालयातील दुरवस्थेविषयी माहिती देत या रुग्णालयाची तपासणी करण्याचे सूचना यावेळी केली. सभागृह नेता शशिकांत जाधव यांनीही रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी समिती नेमण्याची सूचना केली. महापौर वाघ यांनी एक कोटी रुपयांच्या मशिनरी खरेदीला मंजुरी देत सदस्यांनी केलेल्या आरोपावरून रुग्णालयांच्या पाहणीसाठी गटनेत्यांची समिती स्थापन करण्याबरोबरच बिटको रुग्णालयाचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिले. या आरोपात तथ्य आढळल्यास अधिकार्‍यावर कारवाई करण्याचे आश्वासनही यावेळी महापौरांनी दिले.

कर्मचारी दोषी, अधिकारी निर्दोष
सतत गैरहजर राहत असल्यावरून सदाशिव कचरू भोर या कर्मचार्‍यावर प्रस्तावित केलेल्या कारवाईस सदस्य संजय चव्हाण, गुरुमित बग्गा यांनी विरोध करत उद्यान, यांत्रिकी, विद्युत आणि बांधकाम विभागातील अधिकारी दोषी आढळूनही प्रशासन त्यांना पाठीशी घालत आहे आणि दुसरीकडे मात्र गैरहजर राहिल्याच्या कारणावरून कर्मचार्‍यावर कारवाई होत असल्याच्या प्रकारास विरोध केला. महापौरांनीही हा विषय नामंजूर करत प्रशासनावरच हा निर्णय सोडला.