आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्याने सुरुवात: संघटन उभारणीचा पुन्हा शून्यापासून श्रीगणेशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पालिका निवडणूक काळातील काही घटनांमुळे शिवसेनेची शहर संघटना विस्कळीत झाली आहे. इथे ‘शून्यातूनच विश्व निर्माण करावे लागणार आहे, याची मला कल्पना आहे’, असे उद्गार शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी काढले. एक प्रकारे नाशकातील शिवसेनेचे संघटन शून्यापर्यंतच येऊन पोहोचल्याचा प्रत्यय आल्याचे त्यांनी कबूल केले.

शिवसेना कार्यालयात बुधवारी दिवसभर विभागनिहाय बैठका झाल्या. त्यानंतर पत्र- कारांशी ते बोलत होते. पक्ष बांधणीसाठीच या बैठका सुरू असल्याचे ते म्हणाले. सर्वच आजी-माजी पदाधिकारी आणि मूळच्या शिवसैनिकांना कार्यप्रवण करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महानगरप्रमुखपदाबाबत निर्णय संघटन भक्कम केल्यानंतर..
पक्षबांधणी करताना प्रथम पाया, मग भिंत आणि नंतरच कळस असेच स्वरूप राहील. विभागस्तरावरील संघटन भक्कम केल्यानंतरच महानगरप्रमुख पदाबाबत विचार होईल. त्याबाबतच्या घोषणेची घाई करणार नसल्याचेही मिर्लेकर यांनी नमूद केले.

... तर माझेही पद काढावे
नाराज पदाधिकार्‍यांना पुन्हा पक्षकार्यासाठी प्रोत्साहन, जुन्या-जाणत्या शिवसैनिकांना पुन्हा सक्रिय केले जाईल. संघटन बांधताना निष्क्रियांना बाजूला केले जाईल. योग्य काम न करणार्‍याचे पद काढायलाही मागेपुढे पाहणार नाही. मी स्वत: चांगले काम करीत नसेन तर पक्षाने माझेदेखील पद काढावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. पक्षसंघटना वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे मिर्लेकर यांनी नमूद केले.

नगरसेवकांकडे तीन प्रभागांचे पालकत्व
शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाकडे त्याच्या प्रभागाव्यतिरिक्त आणखी दोन, अशा तीन प्रभागांची जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे सूतोवाच शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिले. येत्या दोन महिन्यात भक्कम संघटना उभे केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बुधवारच्या विभागनिहाय बैठकीनंतर त्यांनी ‘दिव्य मराठी’शी संवाद साधला. गटप्रमुख, उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख, प्रभागप्रमुख आणि विभागप्रमुख हीच पदे सर्वाधिक महत्त्वाची आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे आधी महानगरप्रमुख किंवा जिल्हाप्रमुख निवडून मग त्यांनी कार्यकारिणी निवडण्याची पद्धत बंद करून आता प्राथमिक स्तरापासूनच कार्यकारिणी निवडली जाईल. या एकूण कामासाठी दोन ते तीन महिने लागतील असे ते म्हणाले. गरज पडेल, त्या-त्या वेळी तीव्र आंदोलने छेडण्यासही मागेपुढे राहणार नाही, असे मिर्लेकर म्हणाले.