आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात मिळकतधारकांच्या थकबाकीवर आता 24 टक्के दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मिळकतीवरील कर भरण्यास टाळाटाळ करणार्‍यांना आता थकबाकी असलेल्या एकूण कराच्या रकमेवर 1 जानेवारीपासून दरमहा 2 टक्के व्याजाची शास्ती लागू होणार आहे. यामुळे वर्षभरात 24 टक्के इतक्या व्याजास सामोरे जावे लागणार आहे. 1 ऑक्टोबर 2013 पासून ही शास्ती लागू होणार होती; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ही कार्यवाही पुढे ढकलण्यात आली होती.
मिळकत करातून स्थानिक स्वराज्य संस्थांना अल्पसे उत्पन्न मिळते. त्यातही अनेक मिळकतधारक वर्षानुवर्षे थकबाकीच भरत नसल्याचे निदर्शनास आल्याने त्याअनुषंगाने महापालिका अधिनियमातील कलम 41 (1) नुसार शासनाने थकबाकीसाठी शास्तीची तरतूद केली आहे. नाशिकव्यतिरिक्त मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण डोंबिवली, पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये ही कार्यवाही आधीच सुरू आहे. थकबाकी असलेल्या रकमेवर दरमहा 2 टक्के याप्रमाणे पहिल्या सहा महिन्यांसाठी 12 टक्के तसेच यानंतरही कराचा भरणा न केल्यास त्यापुढील सहा महिन्यांसाठी 12 टक्के म्हणजे वर्षभरात एकूण 24 टक्के व्याजाला नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे.
व्याजाची रक्कम दिसेल बिलात..
तांत्रिक अडचणीमुळे यापूर्वी आकारण्यात आलेल्या व्याजाची रक्कम कर भरणा बिलामध्ये दिसत नव्हती. त्यावर नागरिकांनी हरकती घेतल्या होत्या. यामुळे ही शास्ती थांबविण्यात आली होती. आता ही अडचण दूर केल्याने 1 जानेवारीपासून आकारल्या जाणार्‍या बिलामध्ये व्याजाच्या रकमेचा स्वतंत्र रकाना असेल. त्यात ती रक्कम नमूद केली जाणार असून, यापूर्वी घेण्यात आलेली व्याजाची रक्कम नव्या बिलामधून वजावट करून मिळणार आहे.
तत्काळ थकबाकी भरावी
1 जानेवारीपासून शास्ती लागू होणार असल्याने नागरिकांनी कराचा भरणा वेळेत करून महापालिकेला सहकार्य करावे. तसेच, दंड अथवा शास्ती आकारली जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
-आर. एम. बहिरम, उपायुक्त, विविध कर विभाग
पाणीपट्टी
सातपूर - 73 लाख 37 हजार 844
पंचवटी - एक कोटी 8 लाख 52 हजार 591
सिडको - दोन कोटी 56 लाख 98 हजार 931
नाशिकरोड-दोन कोटी 20 लाख 18 हजार 936
पश्चिम - दोन कोटी 73 लाख 73 हजार 946
पूर्व - दोन कोटी 12 लाख 60 हजार 784
घरपट्टी
सातपूर - 5 कोटी 30 लाख 5 हजार 829
पंचवटी - 7 कोटी 51 लाख 76 हजार 708
सिडको - 9 कोटी 57 लाख 64 हजार 287
नाशिकरोड - 8 कोटी 5 लाख 9 हजार 834
पश्चिम - 8 कोटी 51 लाख 12 हजार 286
पूर्व - 9 कोटी 39 लाख 70 हजार 972
एकाच दिवसात एक कोटी
30 डिसेंबर 2013 रोजी एकाच दिवसात महापालिकेच्या सहाही विभागांमध्ये पाणीपट्टी व घरपट्टीच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा कर नागरिकांनी भरला.