आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकल्याण समितीच्या विविध उपक्रमांना ‘ब्रेक’, खर्चमर्यादा १५ लाखांवरून एक लाखावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - निधीच्या डखडाटाचा फटका आता महापालिकेतील महिला बालकल्याण समितीला बसला असून, अक्षरश: राष्ट्रपुरुष वा महिलांसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची पुण्यतिथी वा जयंतीचे कार्यक्रमही बंद करण्याची वेळ समितीवर आली आहे. दिनविशेषाप्रमाणे महिला वा बालकांसाठी विशेष कार्यक्रम घेण्याच्या इच्छेलाही मुरड घालावी लागली असून, किमान पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकात तरी वाढीव तरतूद करून देण्याची मागणी आता समितीकडून केली जाणार आहे.

महिला बालकल्याण समितीच्या सभेत सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत कामे होणार नसतील तर समिती बरखास्त करा, असे सुनावले होते. या पार्श्वभूमीवर समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला असता बहुतांश निधी अखर्चित असल्याचे उघड झाले. महिला बालकल्याण समितीला नऊ कोटी २० लाख रुपयांची तरतूद होती. त्यातील बहुतांश निधी अखर्चित असून, अनेक कामांच्या फायली लेखा विभागाच्या प्रवासात प्रलंबित असल्याचे चित्र आहे.

सकस आहार महिला स्वयंरोजगारासाठी असलेला तीन कोटी रुपयांचा निधी मार्चपर्यंत खर्च होऊ शकतो. मात्र, आकस्मिक खर्चाची मर्यादा १५ लाखांवरून एक लाखांवर केल्यामुळे महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम घेण्यावर निर्बंध आले आहेत. सूत्रांच्या माहितीप्रमाणे निधीअभावी अनेक कार्यक्रम घ्यायचे कसे, असा पेच निर्माण झाला आहे. असाच प्रकार महिला समुपदेशनाबाबतही असून, सहा विभागांतील कार्यक्रमांसाठी सहा लाख रुपये दिल्‍यामुळे हा निधी पडून आहे. दिनविशेषानुसार महिलांसाठी विशेष कार्यक्रम घेण्याचा महिला बालकल्याण समितीचा प्रस्ताव असून, त्यासाठी एका विशिष्ट संस्थेवर वार्षिक जबाबदारी देण्याचा विचार आहे. जेणेकरून प्रत्येक कार्यक्रमासाठी आयत्या वेळेला फाईल फिरवून संस्था निश्चित करण्यात मूळ काम बाजूला राहणार नाही, असा उद्देश आहे. मात्र, या योजनेलाही निधीअभावी ‘ब्रेक’ लागला असून, पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकात वाढीव तरतुदीसाठी समिती प्रयत्न करणार आहे. त्यामुळे या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे.

निधीअभावी उद्भवला पेच
दरम्यान,महिला बालकल्याण समितीच्या निधीसंदर्भातील खर्चावर मर्यादा आल्याने निधीअभावी अनेक कार्यक्रम घ्यायचे तरी कसे, असा पेच समितीसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे विविध कार्यक्रमांच्या संयोजनावर मर्यादा आल्या आहेत. असाच प्रकार महिला समुपदेशनाबाबतही असून, सहा विभागांतील कार्यक्रमांसाठी सहा लाख रुपये दिल्‍यामुळे हा निधीदेखील पडून आहे.
वंचित बालकांचा मेळावा अधांतरीच
१४नोव्हेंबर रोजी दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून महापालिकेने वंचित बालकांसाठी मेळावा घेण्याचे िनयोजन केले होते. प्रत्यक्षात फायलीच्या प्रवासात या कार्यक्रमासाठी खर्च करण्याची तरतूदच मंजूर झाली नाही. गत चार महिन्यांपासून ही फाईल लेखाधिकाऱ्यांच्या अभिप्रायापोटी पडून असल्यामुळे चालू वर्षात कार्यक्रम होणार की नाही, याविषयीची साशंकता सहायक आयुक्त डॉ. वसुधा कुरणावळ यांनी पत्रकारांशी बा ेलताना व्यक्त केली.