आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकच्या ‘रामायण’ मध्ये महिन्याकाठी होते अडीच लाखांचे ‘चहापाणी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अल्पोपहारासाठी प्रत्येकी 700 रुपये खर्च होत असताना त्यात महापौर कसे मागे राहणार? मिळालेल्या माहितीनुसार महापौरांचे निवासस्थान असलेल्या ‘रामायण’मध्ये महिन्याला अल्पोपहार आणि चहापाण्यावर तब्बल अडीच लाख रुपये महिन्याला खर्च होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

आर्थिक अडचणीत सापडलेल्या महापालिकेतील ‘खाबूगिरी’ मात्र वर्षानुवर्षांपासून जोरात असते. याच ‘खाबूगिरी’चा नवा अध्याय अल्पोपहार प्रकरणातून समोर आला आहे. शहरातील तारांकित आणि उच्चभ्रू हॉटेल्सच्या दरापेक्षाही कितीतरी पटीने अधिक खर्च महासभेतील अल्पोपहारावर होत असल्याची बाब ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणली होती. महासभेतील नाश्त्यासाठी प्रत्येकी तब्बल 700 रुपयांची उधळण होत असल्याचे यातून स्पष्ट झाले. महासभेत उपस्थितांसाठी स्वतंत्र जेवण वा अल्पोपहाराची पालिका अधिनियमात तरतूदच नाही, हे विशेष. अल्पोपहाराचे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता लक्ष लागले आहे ते महापौरांच्या ‘रामायण’ या निवासस्थानाकडे. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘रामायण’मध्ये होणार्‍या चहापान, अल्पोपहारावर लाखोंचा खर्च होतो. महापौरांकडे येणारे शिष्टमंडळ, पाहुणे आणि अन्य अभ्यागतांसाठी ही व्यवस्था असते, असा दावा ठेकेदार करतो.

नारळासाठी एकच ठेकेदार
महापालिका, रामायणवरील पाहुण्यांचा शाल-नारळ देऊन सत्कार होतो. या वस्तूंचा पुरवठा करण्याचे कामही विशिष्ट ठेकेदार करत असतो. मात्र, शाल आणि नारळ खरेदीची महापालिका कायद्यात तरतूद नसल्यामुळे संबंधित ठेकेदार अल्पोपहारातून या वस्तू आणि पदार्थांचा खर्च भागवतो, असे सर्मथन केले जात आहे. प्रत्यक्षात शाल आणि नारळांची देयके वेगळे निघत असल्याचे निदर्शनास येते.

दूध का दूध..!
‘रामायण’मधील अल्पोपहारावर खर्च होत असतानाच या व्यतिरिक्त याच निवासस्थानात महिन्याला हजारो लिटर दूध रिचवले जात असल्याचे पुढे आले आहे. मात्र, महिन्याला किती लिटर दूध वापरले जाते याची आकडेवारी मात्र प्रशासनाच्या दप्तरी नाही. अशी आकडेवारी तयार ठेवल्यास कधीही ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ होऊ शकेल.

एका भोजनाचे बिल झाले होते 20 हजार
‘रामायण’वर खाण्यापिण्यावर किती खर्च होत असेल याची चुणूक यापूर्वीदेखील आली आहे. 5 डिसेंबर 2008 रोजी झालेल्या महासभेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या खर्चात रामायणवर एक बैठक झाली होती. या बैठकीला शिवसेनेचे तत्कालीन संपर्कप्रमुख अरविंद सावंत असल्याचे दर्शवित त्यांच्या भोजनाचे तब्बल 19 हजार 425 रुपयांचे बिल फाडण्यात आले होते. आपल्या नावाचा उपयोग करून हे बिल काढलेले आहे, असे सांगत सावंत यांनीही इतका खर्च झालाच नसल्याचे स्पष्ट केले होते.