आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका: वादग्रस्त एलईडीचा ठरावच चुकीचा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- वादग्रस्त एलईडी प्रस्तावाला उपसूचना देणार्‍या दोघा माजी नगरसेवकांनी माघार घेतल्याने या विषयाचे गूढ आणखी वाढले आहे. या प्रस्तावासंदर्भात एक एक वाद उभा राहत असतानाच प्रशासनाने एलईडीविषयी केलेला ठरावही बेकायदेशीर असल्याची बाब समोर आल्याने या विषयाची गुंतागुंत अधिक वाढली आहे.

ऊर्जा बचतीच्या अनुषंगाने प्रशासनाने तेराव्या वित्त आयोगांतर्गत शहरात 25 हजार एलईडी लाइट फिटिंग्ज बसविण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यास काही नगरसेवकांचा झालेला विरोध डावलून महासभेने हा विषय मंजूर केला होता. फिटिंग्जसाठी 45 कोटी 93 लाखांची रक्कम वित्त आयोगाच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचे प्रस्तावात म्हटले होते. मात्र शहरात 69 हजार पथदीप असल्याने उर्वरित लाइट फिटिंग्जसाठी कोणत्या निधीतून पूर्ण करणार, यासंदर्भात मात्र विद्युत विभागाने कोणताही अभिप्राय दिला नाही. मात्र प्रशासनाने ठेकेदाराच्या माध्यमातून 44 हजार पथदीपांची फिटिंग्ज पूर्ण करण्याचा ठराव मागील दाराने करण्यात आल्याचा आरोप नगरसेवकांनी केला होता.

हा ठराव करताना माजी दोन नगरसेवकांनीही त्यास उपसूचना दिल्याने प्रशासनाचे फावले होते. मात्र आता याच दोघांनी माघार घेतल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. महासभेने केलेल्या ठराव क्रमांक 933 साठी संबंधित नगरसेवकांनी उपसूचना दिली होती. मात्र ही उपसूचना ठराव क्रमांक 934 ला जोडली गेल्याने प्रशासनाकडूनच मोठी चूक घडल्याने हा ठरावच बेकायदेशीर असल्याची बाब समेार आली आहे.

यामुळे संबंधित अधिकारीच आता अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.