आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिक- महापालिकेची अर्थवाहिनी मानल्या जाणार्या स्थायी समितीवर वर्णी लावण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांमधील मातब्बरांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. महापौरांकडे गटनेत्यांची बैठक झाली असून, यात संभाव्य फेरबदलाबाबतही चर्चा झाली; मात्र नवीन सदस्यांची अधिकृत घोषणा 28 मार्च रोजी होणार्या महासभेत होईल.
महापौर यतिन वाघ यांच्या ‘रामायण’ निवासस्थानी मनसेचे गटनेते शशिकांत जाधव, अपक्ष गटनेते गुरुमित बग्गा, कॉँग्रेसचे गटनेते लक्ष्मण जायभावे, राष्ट्रवादीचे गटनेते विनायक खैरे यांची बैठक झाली. सुजाता डेरे, गुलजार कोकणी आदीही उपस्थित होते. 28 मार्च रोजी सदस्यांच्या नावाची घोषणा महापौर करणार असून, प्रत्येक पक्षातील संभाव्य फेरबदलबाबत अनौपचारिक चर्चा झाली.
मनसे, राष्ट्रवादीकडे लक्ष
मनसेकडून पाच नवीन सदस्य दिले जाणार असल्याचे आमदार वसंत गिते यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र,गेल्या वेळी स्थायी सभापतिपदी पराभूत झालेले उमेदवार अशोक मुर्तडक यांच्या सदस्यत्वाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मुर्तडक यांना पुन्हा सभापती बनवण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे मनसेच्या गोटातून सांगितले जात आहे. राष्ट्रवादीने तीन सदस्यांचे राजीनामे घेतले असून, येथेही नवीन सदस्यांनाच संधी दिली जाणार असल्याचे गटनेते खैरे यांनी सांगितले.
भाजप, सेनेत ‘जैसे थे’
भाजपकडून बाळासाहेब सानप व सीमा हिरे यांचे सदस्यत्व कायम राहण्याची शक्यता आहे. शिवसेनेत ‘एक व्यक्ती -एक पद’ या संकल्पनेप्रमाणे अजय बोरस्ते यांनी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दुसरी जागा सूर्यकांत लवटे यांच्या रूपाने असून, लवटे कायम राहतील व बोरस्ते यांची जागा भरली जाईल, अशी अटकळ आहे.
काँग्रेसमध्ये रस्सीखेच
शहर कॉँग्रेसमध्ये दोन गटांत शीतयुद्ध असताना आता स्थायी समितीच्या दोन जागांवर कोणाची नियुक्ती होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दिनकर पाटील व मावळते सभापती उद्धव निमसे यांच्या जागी वर्णी लावण्यासाठी काहींनी थेट मुंबई वार्या सुरू केल्याचे समजते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.