आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation Mayer Adv. Yatin Wagh Tour At Nashik

कारभारी निघाले दौर्‍यावर; निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांकडे वेधले लक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुने नाशिक- महापौर अँड. यतिन वाघ व आमदार वसंत गिते यांनी प्रभाग 30 मधील समस्या जाणून घेण्यासाठी शुक्रवारी दौरा केला. या दौर्‍यात महापौरांकडे नागरिकांनी विविध समस्यांचा पाढा वाचत निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांनंतरही प्रभागामधील समस्या ‘जैसे थे’ असल्याच्या तक्रारी केल्या.

दौर्‍यावेळी काठेगल्ली नं. 3 मध्ये नागरिकांनी संताप व्यक्त करताना प्रभागात डासांचा प्रादुर्भाव असून, अनेक महिन्यांपासून या ठिकाणी धूर फवारणी झाली नसल्याचे सांगितले. परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी येते. मोकाट कुत्र्यांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढलेली असताना त्याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याचे सांगण्यात आले. महिलांसाठी असलेल्या उद्यानात रात्रीच्या वेळी अंधार पसरलेला असतो. या ठिकाणी अस्वच्छता आहे. तुमचा दौरा असल्याने आज या ठिकाणी साफसफाई दिसून येत असल्याचेही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. महिलांसाठी स्वतंत्र जॉगिंग ट्रॅकची मागणीही या वेळी करण्यात आली.

महापौरांचा ताफा टाकळीरोड येथे आला असता राष्ट्रवादी महिला आघाडीच्या लता शिवाजी वालझाडे यांनी महापौरांना निवेदन देऊन परिसरातील उद्यानामधील कचराकुंडी काढ़ून टाकावी व तेथे विजेची सोय करण्याची मागणी केली. परिसरात नियमित घंटागाडी येत नसल्याने नागरिकांना उघड्यावर नाईलाजाने कचरा टाकावा लागतो. र्शी स्वामी सर्मथ मंदिर आवारात पेव्हरब्लॉक बसविण्याची मागणी केली. या वेळी नगरसेविका मेघा साळवे, हरिभाऊ लोणारी, मिलिंद भालेराव, चंद्रकांत थोरात, दत्ता शिंदे आदी उपस्थित होते.

कर्जाची केली संपूर्ण परतफेड
यापूर्वी सत्तेत असलेल्यांनी महापालिकेवर सुमारे 450 कोटी रुपयांचे कर्ज केले होते. त्या कर्जाची संपूर्ण परतफेड केल्याने विकासकामांसाठी उशीर होत आहे. परंतु, यापुढे विकासकामे पूर्ण करण्याकडे लक्ष देणार असल्याचे या वेळी आमदार वसंत गिते यांनी सांगितले.

..तर महापौरांनी रोज दौरा करावा
महापौरांच्या दौर्‍यावेळीच टाकळीरोड येथील गार्डन व परिसरात जागोजागी कचरा गोळा करून तो जाळत असल्याचे दृश्य दिसून आले. महापौरांचा दौरा असल्याने संपूर्ण प्रभागात कधी न दिसणारी स्वच्छता दिसून आल्याने महापौरांनी रोज दौरा करावा, अशी चर्चा नागरिकांमध्ये होती.

दौर्‍यामागे राजकारण नसल्याचा खुलासा
शहरात पाहणी दौरा करताना यात कोणतेही राजकारण आणलेले नाही. केवळ प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासंदर्भात महापालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांना नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार तत्काळ समस्या सोडविण्याचे आदेश दिल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. दौर्‍याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी केला होता. त्यांचा मुद्दाही या वेळी महापौरांनी या वेळी खोडून काढला.

दौर्‍यात मांडल्या समस्या
महापौरांचा दौरा आपल्या प्रभागात येणार असल्याचे समजल्याने नागरिकांनी परिसरात असलेल्या विविध समस्यांचा पाढाच वाचला. यामध्ये स्वच्छतेपासून प्रभागात विविध सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. महापालिका निवडणुकीवेळी मनसेने दिलेल्या विविध आश्वासनांची आठवणही काही नागरिकांनी त्यांना करून दिली.