आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation Meet For Godavari River Border

गावठाणातील पूररेषेवरून महासभेमध्ये गदारोळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नासर्डी पूररेषेतील बांधकामांना परवानगीबाबत सुरू असलेल्या वादात 1966 पूर्वी वसलेल्या जुन्या नाशिकसारख्या गावठाणातील पूररेषेतल्या बांधकामांना दुरुस्ती वा नूतनीकरण परवानगीच्या मुद्यावरून महासभेत गदारोळ झाला. सर्वपक्षीयांची मागणी पाहून राज्यातील अन्य महापालिकांनी घेतलेल्या निर्णयांचा अभ्यास करून पुढील महासभेत निर्णयाचे आश्वासन महापौर यतिन वाघ यांनी दिले.
अपक्ष गटनेते गुरमित बग्गा यांनी मूळ नाशिकमधील अशा बांधकामांना परवानगी का देत नाही, असा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्र नगरविकास अधिनियम 1966 मध्ये लागू झाला. त्यापूर्वीच्या बांधकामांना अधिनियमानेच संरक्षण दिले असल्यामुळे जुन्या नाशिकमधील बांधकामांना प्रतिबंध करताच येणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. जुने नाशिकमधील पडके वाडे, इमारतींचे नूतनीकरण वा दुरुस्तीची गरज आहे. त्या बदल्यात सशर्त परवानगी म्हणून भविष्यातील परिणामांची जबाबदारी विकसकाने घेण्याचा तोडगा निघेल, असा युक्तिवाद त्यांनी केला. प्रकाश लोंढे यांनी यापूर्वी प्रतिज्ञापत्र घेऊन बांधकामांना परवानगीचा विषय झाल्याची आठवण करून दिली. सुधाकर बडगुजर, वत्सला खैरे, संजय चव्हाण, रंजना पवार व अन्य नगरसेवकांनी यांनी चर्चेत भाग घेतला.

...तर सिंहस्थालाही विरोध करू
कॉँग्रेसचे नगरसेवक शाहू खैरे यांनी सिंहस्थामुळे सुरू झालेल्या कामात जुने नाशिकमधील रहिवासी विस्थापित होणार असल्याकडे लक्ष वेधले. त्यांची बांधकामे पूररेषेत असल्यामुळे त्यांना मोबदला वा पर्यायी निवास व्यवस्था मिळणार नाही. त्यामुळे त्यांची घरे जाणार असतील, तर सिंहस्थाला कडाडून विरोध केला जाईल, असा इशाराही खैरे यांनी दिला.