आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation Mission Cleanup Issue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक महापालिकेचा मिशन क्लीनअप अभियानाचा ‘स्वच्छ’ देखावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- घंटागाडी आणि धूरफवारणीचा 13 कोटी 50 लाखांचा मक्ता आणि शहरात अस्वच्छता करणार्‍यांवर निगराणी ठेवण्यासाठी ‘अमुल्या क्लीनअप’ या खासगी संस्थेची नेमणूक करूनही नाशिककरांची अस्वच्छतेपासून सुटका होऊ शकलेली नाही. शुक्रवारपासून सुरू झालेल्या शून्य कचरा अभियानाने तरी परिस्थिती बदलेल का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. महापालिकेने हाती घेतलेले वर्षातील हे दुसरे महत्त्वाकांक्षी मिशन क्लीनअप’ आहे.

स्वच्छता कर्मचार्‍यांवर कोणतेही नियंत्रण नसताना त्याच कर्मचार्‍यांमार्फत स्वच्छता मोहीम राबवून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय साध्य करू पाहत आहेत, की स्वच्छतेचा हा नुसता देखावा करण्यात येत आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पूर्व विभागातून मोठय़ा तक्रारी
पूर्व विभागातील उघड्या गटारी, अनियमित घंटागाडी, रस्त्यांची दुरवस्था, बंद पथदीप, अस्वच्छतेचा फैलाव यांसह अनेक समस्यांबाबत लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या मोठय़ा प्रमाणात तक्रारी आल्याने, त्याची दखल घेत पालिकेच्या पूर्व विभागाने प्रभाग क्रमांक 38 मध्ये शुक्रवारी स्वच्छता मोहिमेस प्रारंभ केला. या वेळी नगरसेविका नीलिमा आमले व पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी बजरंगवाडी, कल्पतरूनगर, गणेशबाबानगर, हॅपी होम कॉलनी, सिद्धार्थनगर यांसह इतर ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली.

सहकार्य करावे
अस्वच्छतेमुळे वेगवेगळे आजार उद्भवतात. त्यामुळे नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकू नये. महापालिका स्वच्छता मोहीम राबविणार असून, नागरिकांनी तिला सहकार्य करावे.
-अर्चना जाधव, नगरसेविका

प्रभाग चारमध्ये स्वच्छता मोहीम
प्रभाग 4 मध्ये स्वच्छता मोहिमेस शुक्रवारी सकाळी प्रारंभ झाला. दत्तनगर, जाणता राजा कॉलनी, शिंदेमळा, जनार्दन कॉलनी, हमालवाडी, स्वामी सर्मथ कॉलनी, सुदर्शन कॉलनी, कॅनॉलरोड, फुलेनगर येथे मोहीम राबवली.

नगरसेवक ढगेंचा दिखाऊ मोहिमेस विरोध
महापालिकेच्या आरोग्य विभागाने नाशिकरोडला पंधरा दिवसांच्या शून्य कचरामुक्त मोहिमेस जेलरोडच्या प्रभाग 32 मधून शुक्रवारी प्रारंभ केला. मात्र, दिखाऊ व फोटो काढण्यासाठी राबविण्यात येणार्‍या मोहिमेस शिवसेनेचे नगरसेवक शैलेश ढगे यांनी विरोध दर्शवत उद्घाटनावर बहिष्कार टाकला.

विभागातील 12 प्रभागांत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यात हौदात गप्पी मासे सोडणे, औषध फवारणी, नालेसफाई, घरोघरी जाऊन पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, इमारतीवरील जुने टायर उचलण्यात येत आहेत. डास व अस्वच्छतेमुळे साथीच्या आजाराची लागण होत असल्याने जनजागृतीबरोबरच कावीळ, मलेरिया, अतिसार या आजारांच्या माहितीचे पोस्टर्स चिकटवण्यात येत आहेत.

मोहीम नव्हे, फॅशन शो
उद्घाटनाचे फोटो काढून प्रसिद्धी मिळवण्यासाठीच्या या दिखाऊ मोहिमेस विरोध आहे. गाजावाजा करीत उद्घाटन करून कर्मचारी हातात झाडून घेऊन प्रभागात फिरतात; मात्र स्वच्छता व नागरिकांचे समाधान होत नाही. मोहिमेतून बदल अपेक्षित आहे.
-शैलेश ढगे, नगरसेवक, प्रभाग 32

स्वच्छतेसह जनजागृती
विभागातील 12 प्रभागांत 16 ऑगस्ट पर्यंतच्या मोहिमेत स्वच्छता, जनजागृती तसेच हौदात गप्पी मासे सोडण्यात येत आहेत. स्वच्छता कर्मचार्‍यांना बांबूचे झाडू देण्यात आले आहेत.
-संजय दराडे, निरीक्षक, आरोग्य विभाग