आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘स्थायी’कडे आयुक्तांची पाठ;सभापतींनी फोन करूनही अनुपस्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महापालिकेच्या तिजोरीतील खडखडाटाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजय खंदारे यांनी आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकावरील चर्चेसाठी बोलविलेल्या बैठकीकडेच पाठ फिरवल्यामुळे सदस्यांच्या पदरात नाराजी व्यक्त करणे व हताश होण्यापलीकडे काहीच पडले नाही. विशेष म्हणजे, आयुक्त बैठकीला येतील म्हणून काहीकाळ सदस्यांनी वाटही बघितली. एवढेच नव्हे तर दूरध्वनीवरून त्यांना राजी करण्यासाठी सभापतींना धडपडही करावी लागली.

स्थायी समितीसमोर महापालिका आयुक्तांनी एक हजार 876 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. या अंदाजपत्रकाला मंजुरी देणे व त्यातील त्रुटी, नवीन उपायांबाबत चर्चा करण्यासाठी स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे यांनी मंगळवारी बैठक बोलावली होती. सकाळी 11 वाजता होणार्‍या बैठकीसाठी सदस्यांसह सभापती हजर झाले. मात्र, आयुक्तांचा पत्ता नव्हता. प्रभारी आयुक्त म्हणून हरिभाऊ फडोळ यांच्याकडे सूत्रे असल्याचे बघून सदस्यांनी आयुक्तच हवेत, अशी मागणी केली. पालिकेच्या उत्पन्नवाढीसंदर्भात महत्त्वाच्या सूचना करणे तसेच अंदाजपत्रकातील त्रुटींबाबत चर्चा त्यांच्याच उपस्थितीत व्हावी, असा आग्रहही सदस्यांनी धरला. सभापतींनीही सूचना केल्यावर फडोळ यांनी आयुक्तांशी दूरध्वनीवर चर्चा केली. मात्र, त्यांनी येण्यास नकार दिला. त्यानंतर काही सदस्यांनी सभा तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला. पण, सभा घेण्याचा निर्णय झाल्यावर सूर्यकांत लवटे यांनी हरकत घेतली. स्थायी समितीने शिफारस केलेल्या कामांची यादी गेल्यावर्षी काढून टाकली गेली. त्यामुळे आयुक्तांची उपस्थिती असलीच पाहिजे असे ते म्हणाले. वातावरणातील तणाव वाढत असल्याचे बघून सभापतींनीही आयुक्तांशी चर्चा केली. परंतु, त्यावर आयुक्तांकडून घरपट्टी व अन्य वाढ सुचवली असून, आता तुमच्या अधिकारात निर्णय घ्या, असे उत्तर मिळाल्याचे सभापतींनी सांगितले. तसेच पैसे नसल्यामुळे वाढीव कामांबाबतही निर्णय घेण्याबाबत आयुक्तांनी सांगितल्यामुळे आता अर्थच उरला नसल्याचे धोंगडे म्हणाले. त्यानंतर सदस्यांनी अंदाजपत्रकावरील चर्चेत आयुक्तांनाही चिमटे घेतले. आयुक्तपदी थेट आयएएस असलेल्या व्यक्तीची नेमणूक करण्याचा शासनाने आग्रह पूर्ण केल्यावरही अपेक्षाभंगच होत आहे, असे राजकीय टोले लगावले गेले.

30 लाख रुपयांत रस्ते कसे करणार?
आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे नाराज झालेल्या लवटे यांनी 30 लाख रुपयांत प्रभागातील रस्ते कसे करणार, असा सवाल केला. प्रभागातील एकूणच रस्त्यांचा विचार केला, तर 30 लाखांत छोटा तुकडाही होत नाही. सर्वच पैसे लिंकरोडवर खर्च कराल तर प्रभागातील जनतेला काय उत्तर द्यायचे, अशीही विचारणा त्यांनी केली. त्यावर धोंगडे यांनी पैसेच नसल्यामुळे काय करायचे, असे म्हणत सभेचे कामकाज सुरू केले.

आयुक्तांच्या विशेषाधिकारावर हरकत
नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी या वेळी बैठकीत महापालिका अंदाजपत्रकात आयुक्तांच्या अधिकाराखाली पाच कोटी रुपयांचा राखीव निधी ठेवलाच कसा, असा सवाल केला. मुळात आयुक्तांना पुनर्नियोजन व एखाद्या लेखाशीर्षखाली निधी खर्च न झाल्यास अन्यत्र वळवण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे पुन्हा पाच कोटी स्वतंत्ररीत्या राखीव ठेवण्याची गरज काय? अशी हरकत लोंढे यांनी या वेळी घेतली.