आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation News In Marathi, Commissioner Sanjay Khandare, Divya Marathi

ठेकेदार नगरसेवकांच्या विषयावर आयुक्त बदलीमुळे पडदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महासभेतही अनेक ठेकेदार बसतात, असे आरोप करून ठेकेदार नगरसेवकांची पोलखोल करण्याच्या विषयावर आता आयुक्त संजय खंदारे यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे पडदा पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे ठेकेदारीशी संबंध असलेल्या नगरसेवकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.


17 कोटी रुपयांच्या कॅमेरे खरेदीवरून आयुक्त विरुद्ध नगरसेवक असा संघर्ष उभा ठाकला होता. त्यात विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी कॅमेरे खरेदीसाठी अव्वाच्या सव्वा किमतीचे प्रस्ताव कसे फुगवले गेले, यावर आरोप केल्यावर आयुक्तांनी प्रतिउत्तर देत बडगुजर अँण्ड बडगुजर कंपनीने परवडत असेल तर ठेका घ्यावा, असा टोला लावला होता. पालिकेतील कोणत्या लोकप्रतिनिधीला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या ठेकेदार वा अशा कंपनीशी संबंधित कामे घेता येत नाही, या तरतुदीकडेही आयुक्तांनी लक्ष वेधले होते. त्यानंतर महासभेत अनेक ठेकेदार बसतात, असे जाहीर विधान करून माझ्याकडे अशांबाबत तक्रारीही आल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर पुन्हा नगरसेवक विरुद्ध आयुक्त वाद वाढल्यावर त्यांनी नगरसेवकांशी संबंधित ठेक्यांच्या फायलींचा अभ्यासही सुरू केल्याचे वृत्त होते. आचारसंहितेमुळे आयुक्त व नगरसेवक असा सामना टळला असला तरी निवडणुकीनंतरच्या महासभेत ठेकेदारीचा मुद्दा गाजण्याची चिन्हे होती. मात्र, तत्पूर्वीच निवडणूककाळात पालिकेशी संबंधित कामांच्या निविदा काढल्यामुळे आयुक्तांना बदलीला सामोरे जावे लागले. त्यामुळे तूर्तास तरी ठेकेदार नगरसेवक कोण, याचे रहस्य गुलदस्त्यात असल्याचे चित्र आहे.


संजीवकुमार यांनी स्वीकारली आयुक्तपदाची सूत्रे
आयुक्त खंदारे यांची बदली झाल्यानंतर शासनाच्या आदेशाप्रमाणे आदिवासी विकास विभागाचे आयुक्त संजीवकुमार यांनी सोमवारी सुटीचा दिवस असूनही पालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. दरम्यान, खंदारे हे नवीन नियुक्तीसाठी मुंबईत तळ ठोकून असल्याची चर्चा आहे. निवडणूक आचारसंहिता काळात खंदारेंनी विकासकामांच्या निविदा काढल्याने आक्षेप घेतले गेले. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रारी गेल्या. दरम्यान, रविवारी खंदारेंकडील पदाची सूत्रे स्वीकारण्याबाबत संजीवकुमार यांना पत्र आले. सोमवारी त्यांनी सूत्रे स्वीकारली. त्यांच्याकडे तात्पुरता पदभार असून, खंदारेंना पुढील पदस्थापनेबाबत कळवले जाईल, असे शासनाने म्हटले आहे.