आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation News In Marathi, Flood Line, Divya Marathi

गावठाणातील बांधकामांना खोडा पिंपरी-चिंचवड पॅटर्नचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पूररेषेत मोडणार्‍या गावठाणातील बांधकामांना दुरुस्ती वा नूतनीकरणाची परवानगी देण्यासाठी महापालिकेने पिंपरी-चिंचवड पॅटर्नचा अभ्यास केला. मात्र, तेथे पूररेषेतील बांधकामांना तत्कालीन आयुक्तांनी कठोर भूमिका घेत परवानगी नाकारल्याने पुन्हा शासनाच्या कोर्टात याबाबतचा चेंडू टोलवण्याची वेळ नाशिक महापालिकेवर आली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी त्यावेळी कठोर भूमिका घेत निळ्या पूररेषेतील बांधकामांना परवानगी नाकारल्याचे या पॅटर्नच्या अभ्यासात स्पष्ट झाल्यानंतर पालिकेने वरील भूमिका घेतली आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर धरणसंहितेतील कायद्यात शिथिलता आणण्याबाबत प्रस्ताव पाठवला जाईल, असे नगररचना विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.


डिसेंबर महिन्यातील महासभेत पूररेषेतील बांधकामाचा मुद्दा वादळी ठरला. महाराष्ट्र नगरविकास अधिनियम 1966 मध्ये लागू झाल्यामुळे जुने नाशिकमधील बांधकामांना प्रतिबंध करताच येणार नाही. जुने नाशिकमधील अनेक वाडे, इमारती पडक्या झाल्या असून, त्या जरी पूररेषेत असल्या तरी त्याचे नूतनीकरण वा दुरुस्ती करण्याची गरज आहे. त्या बदल्यात सशर्त परवानगी म्हणून भविष्यात काही अघटित झाले तर त्याची जबाबदारी विकसकाने घ्यावी, अशी तडजोड करण्याचाही प्रस्ताव होता. त्यावर महापौर अँड. यतिन वाघ यांनी राज्यातील अन्य महापालिकांनी अशा बांधकामांबाबत काय निर्णय घेतले, याचा अभ्यास करण्याचे आदेश नगररचना विभागाला दिले होते. त्यानुसार, नगररचना विभागाने ज्या महापालिकेच्या हद्दीतील गावठाण भाग नदीमुळे बाधित होतो, अशा भागाचा अभ्यास केला. यामध्ये पिंपरी-चिंचवड पालिकेच्या हद्दीतही पूररेषेतील बांधकामाचा मुद्दा गाजल्याचे बघून येथील धोरणाचा अभ्यास केला. त्यासंदर्भात माहिती देताना एका अधिकार्‍याने सांगितले की, धरणसंहितेप्रमाणे पूररेषेत नवीन बांधकाम व जुन्या बांधकामाचे नूतनीकरण करता येत नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकाम व पूररेषेतील बांधकामाचा मुद्दा गाजल्यावर तत्कालीन आयुक्तांनी धरणसंहिता कायद्याची अंमलबजावणी करून परवानगी नाकारली. त्यामुळे आता नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवून शिथिलता मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. जुने नाशिक भागातील जुन्या बांधकामांच्या नूतनीकरणासाठी नगरसेवकांचा पाठपुरावाही शासनापर्यंत पोहोचवला जाणार आहे.


पूररेषेतील बांधकामांच्या मुद्यावर चर्चा
डिसेंबर महिन्यात झालेल्या महासभेत नासर्डी नदीच्या पूररेषेत संरक्षक भिंत बांधण्यावरून गावठाणातील बांधकामाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. अपक्ष गटनेते गुरुमित बग्गा यांनी पूररेषेतील बांधकामांना पालिका जर परवानगी देणार असेल तर जे मूळ व जुने नाशिक आहे, त्यातील पूररेषेतील बांधकामांना परवानगी का देत नाही, असा मुद्दा उपस्थित केला होता.