आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation News In Marathi, Lok Sabha Election

मनसे व भाजपसाठी प्रभाग सभापतीपदाची निवडणूक ठरणार सोपी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन सत्ताधारी मनसेने प्रभाग समिती सभापतिपदाची निवडणूक घेण्याची खेळी यशस्वी झाल्यानंतर आता आचारसंहितेचा मुद्दा पुढे करून राष्ट्रवादी त्यास हरकत घेण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, गेल्या वेळी मनसेसोबत गेलेल्या सेनेपुढेही लोकसभा निवडणुकीमुळे काय करायचे, असा प्रश्न पडला आहे. राजकीय तडजोडींना या निवडणुकीत वाव नसल्याने मनसे व भाजपसाठी ही निवडणूक सोपी ठरणार आहे.


निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे प्रभाग सभापतिपदाची निवडणूक होणार नसल्याचे संकेत होते. प्रत्यक्षात पालिकेच्या नगरसचिव विभागाने विभागीय आयुक्तालयाला पाठवलेल्या निवडणूक प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. त्यामुळे आता 28 व 29 मार्चला अनुक्रमे तीन समित्या याप्रमाणे सहा प्रभाग समित्यांसाठी निवडणूक होईल. पालिकेत मनसे व भाजपची सत्ता असली तरी, प्रत्येक प्रभागातील सभापतिपद नगरसेवकांच्या संख्याबळावर आधारित असल्याने पालिकेतील विरोधकांशी हातमिळवणी करून सभापतिपद मिळवण्याची कसरत मागे मनसे व भाजपला करावी लागली होती.


महाआघाडी आणि महायुतीला पूर्णत: ब्रेक
महापौरपद निवडणुकीत राष्ट्रवादी ऐनवेळी तटस्थ राहिल्याने सेना, काँग्रेस, अपक्ष अशा महाआघाडीचा बार फुसका ठरला. मात्र, प्रभाग समिती निवडणुकीत हीच महाआघाडी एकत्र आल्याने मनसे-भाजपला फटका बसला. त्यातून स्थायीचे सभापतिपद हे मनसेकडे असतानाही महाआघाडीतून कॉँग्रेसचे नगरसेवक उद्धव निमसे यांची लॉटरी लागली. पुढे मनसेने सेनेशी तडजोड करून सभापतिपद मिळवले. त्यानंतर प्रभाग सभापतिपदाची समीकरणेही बदलली होती. आता लोकसभेमुळे सेनेची मदत मनसे-भाजपला मिळणार नाही. दुसरीकडे सेनाही काँग्रेस-राष्ट्रवादी व अपक्षांच्या आघाडीशी समझोता करू शकणार नसल्याने मनसेची चिंता कमी झाली आहे.

राष्ट्रवादीला फुटीची भीती
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला कोणाचीही नाराजी परवडण्याजोगी नाही. त्यामुळेच लोकसभेची महत्त्वाची निवडणूक असताना प्रभाग समितीची निवडणूक घेऊ नये, अशी हरकत राष्ट्रवादीकडून घेतली जाण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

सातपूर : येथे 14 नगरसेवक असून, शिवसेनेचा एक नगरसेवक असताना मनसेच्या 6 नगरसेवकांच्या पाठिंब्यावर विलास शिंदे यांना सभापतिपद मिळाले. सेना काय करते यावर मनसेला आशा आहेत. सेना तटस्थ राहिल्यास काँग्रेस आघाडीच्या जुळवाजुळवीवरच सभापतिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे निश्चित होईल.

सिडको : 22 नगरसेवक इतके संख्याबळ असून, येथे भाजपचा एकही नगरसेवक नाही. त्यामुळे सात जागा असूनही मनसेला संभाव्य तडजोडीसाठी शिवसेना किंवा अन्य पक्षांची मदत लागेल. येथे शिवसेनेनेही प्रतिष्ठेची लढत करून जुळवाजुळव केली तर त्यांचा सभापती होऊ शकतो. गेल्या वेळी शिवसेनेच्या पाठिंब्यावर मनसेचे अरविंद शेळके सभापती झाले.

नाशिकरोड : येथे 24 नगरसेवक असून, मनसे व भाजप मिळून आठ नगरसेवक आहेत. शिवसेनेचे 7 नगरसेवक येथे असून, गेल्या वेळी मनसे व भाजपच्या पाठिंब्यावर सेनेला सभापतिपद मिळाले. आता सेना तटस्थ राहिली तर समीकरण कसे जुळवायचे, असा प्रश्न असेल.

नाशिक पश्चिम : या प्रभागात 14 नगरसेवक असून, 8 नगरसेवक सत्ताधारी मनसे व भाजपचे असल्यामुळे स्पष्ट बहुमत आहे. येथे पहिले वर्ष मनसेकडे सभापतिपद होते. आता भाजपकडे राहुल आहेर यांच्या रूपाने सभापतिपद असून, मनसेकडे यंदा हे पद असेल.

पंचवटी : 24 नगरसेवक असून, त्यातील 14 नगरसेवक मनसे व भाजपचे आहेत. पहिल्या वर्षी भाजपकडे परशराम वाघेरे यांच्या रूपाने सभापतिपद होते. त्यानंतर लता टिळे यांच्या रूपाने मनसेकडे सभापतिपद आले. आता येथे भाजपचा पुन्हा दावा आहे.

नाशिक पूर्व : या प्रभागात मनसे व भाजपचे 11 नगरसेवक असून, एकूण संख्याबळ 24 आहे. त्यामुळे मनसेला तीन मतांची गरज भासेल. गेल्या वेळी सेनेच्या पाठिंब्यावर मनसेच्या वंदना शेवाळे सभापती झाल्या. यंदा मात्र सेनेची साथ नसल्याने सत्ताधार्‍यांना जुळवाजुळव करावी लागेल.

मनसे-भाजप युती कायम
स्थानिक पातळीवर मनसे व भाजपची युती आहे. त्यामुळे शिवसेना सोबत नसली तरी भाजपच्या मदतीने प्रभाग सभापती निवडणुकीत रणनीती ठरवली जाईल. वसंत गिते, आमदार, मनसे

मातोश्रीच्या आदेशाची प्रतीक्षा
प्रभाग समिती निवडणुकीत कोणाशी युती करायची, याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून मार्गदर्शन मागवले आहे. मातोश्रीवरून त्याबाबत आदेश येतील. -अजय बोरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना