नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापौर व नगरसेवकांची खरडपट्टी काढल्यानंतर ज्या नानाविध योजना राबवल्या गेल्या, त्याचाच एक भाग असलेल्या ‘एसएमएस पाठवा व कचरामुक्त व्हा’ या सत्ताधार्यांच्या अभिनव योजनेचा बोजवारा उडाला आहे. आरोग्य विभागातील हेल्पलाइनवर नागरिकांनी एसएमएसच पाठवणे बंद केल्याचा आरोग्याधिकार्यांचा दावा आहे.
दीड महिन्यापूर्वी मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी नाशिक दौर्यात नगरसेवकांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली होती. मोठे प्रकल्प तर सोडा, नागरिकांच्या छोट्या समस्याही सोडवण्यात अपयशी ठरल्याची विरोधकांची टीका राज यांच्या जिव्हारी लागली होती. त्यानंतर राज यांना खुश करण्यासाठी अनेक योजना सुरू झाल्या. त्यात अतिक्रमणमुक्त नाशिकसाठी महापौर अँड. यतिन वाघ हे रस्त्यावर उतरले. शहर स्वच्छ करण्यासाठी ब्लॅक स्पॉटपासून तर ‘एसएमएस पाठवा व कचरामुक्त व्हा’ अशा योजनाही सुरू झाल्या. त्यासाठी हेल्पलाइन क्रमांक खुले केले. मात्र, अल्पावधीतच या योजनांकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. उन्हाळ्यात डासांचे प्रमाण वाढले असून, त्यास कचरा जबाबदार असल्याचे चित्र आहे. घंटागाडीच्या अनियमित वेळेबाबतही तक्रार असल्याने कचरा साचत असल्याचे चित्र होते. एसएमएस योजनेच्या प्रतिसादाबाबत विचारले असताना, नागरिकांच्या तक्रारीच येत नसल्याचे उत्तर आरोग्य विभागाने दिले.
जुन्या ठेकेदाराला पुन्हा मुदतवाढ : शहरात डासांचे प्रमाण वाढल्यामुळे सातपूर, पंचवटी विभागात धुरळणीचे आदेश दिले आहे. त्यासाठी जुन्या ठेकेदारालाच पुन्हा मुदतवाढ दिली असून, आचारसंहितेमुळे नवीन ठेका देण्याची प्रक्रिया करता येत नसल्याचे आरोग्याधिकार्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शहरातील डासांची सरासरी घनता 4.3 इतकी असून, ती पाचपेक्षा जादा असता कामा नये, असे संकेत आहेत.
पंधरा दिवसांपासून बंद
लोकांनी पंधरा दिवसांपासून एसएमएस पाठवणे बंद केले आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी कचर्याकडे लक्ष ठेवून असून, घंटागाडीच्या माध्यमातून शहर स्वच्छ ठेवले जात आहे. त्यामुळे बहुधा लोकांनी एसएमएस पाठवणे बंद केले असावे. - डॉ. सुनील बुकाने, आरोग्याधिकारी, महापालिका