आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation Not Wake Up After Godavari Bad Condition

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोदावरीची दुर्दशा बघून नाशिक पालिका प्रशासनरुपी कुंभकर्ण निद्रिस्तच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गोदावरीची गटारगंगा झालेली बघून व्यथित झालेले जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी ‘गोदावरी अशीच अस्वच्छ ठेवायची असेल तर कुंभमेळाच घेऊ नका,’ असे प्रतिपादन केल्यानंतर महापालिका प्रशासन झोपेतून खडबडून जागे होईल, अशी भोळी आशा घेऊन नाशिककर गोदाकाठी रविवारी गेले. मात्र, गोदावरीची दुर्दशा बघून पालिका प्रशासनरुपी कुंभकर्णाला अजूनही जाग आली नसल्याची भावना त्यांची झाली.

नाशिक शहराचे जीवन अखंडितपणे प्रवाही ठेवणारी गोदामाई गेल्या काही वर्षांपासून अशुद्ध पाण्याशी झगडते आहे. पवित्र म्हणून जिचा उल्लेख एकेकाळी होत होता, तिच्या पाण्याला स्पर्श करताना भाविक नकळतपणे नाकावर हात लावतात. र्शद्धा आणि धार्मिकतेच्या संचितावर गोदावरीचे पाणी खळाळते खरे; परंतु याच पाण्याला अशुद्ध बनविण्याचे कार्य पालिकेतील मुखंडांसह काही नादान नाशिककर करीत आहेत.

मलजलावर कोणतीही प्रक्रिया न करताच ते नदीपात्रात सोडून देण्याचे घृणास्पद कृत्य प्रशासनाच्या वतीने सर्रासपणे केले जात आहे. त्यातच नागरिकही स्वयंशिस्त घालून घेत नसल्याने नदीपात्र दिवसेंदिवस अस्वच्छच होत आहे. अस्वच्छतेचे पाणी डोक्यावरून वाहायला लागल्यानंतर काही सुजाण नागरिकांनी उच्च न्यायालयात नदीची व्यथा मांडली आणि न्यायालयानेही पालिकेसह संबंधित यंत्रणांवर ताशेरे ओढले. असे असताना न्यायालयाच्या धाकापोटी तरी नदीपात्र स्वच्छ होईल, अशी अपेक्षा सामान्यांनी बाळगली होती. मात्र, न्यायालयात आपला बचाव करण्यापलीकडे पालिका गोदा स्वच्छतेसाठी कोणतेही ठोस पावले उचलत नसल्याने सामान्यांचा हिरमोडच होत आहे. अशा काळ्याकुट्ट पार्श्वभूमीवर मॅगसेसे पुरस्कारविजेते तथा जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी नाशिकला भेट दिली; परंतु गोदावरीतील अस्वच्छता बघून ते व्यथित झाले. नदीपात्रात सोडण्यात येणारे मलजल तातडीने थांबवा; अन्यथा कुंभमेळाच घेऊ नका, अशी सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली. परंतु, निर्ढावलेल्या प्रशासनाने या सूचनेचेही ‘अघ्र्य’ या नदीपात्रातच देत जणू डॉ. सिंह यांची ‘सिंहस्थ रद्द करण्याची सूचना’ मान्य केल्याचे संकेत दिले आहे. वास्तविक, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या जलतज्ज्ञाने जेव्हा नदी अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली; त्यानंतर प्रशासनाने तातडीने कामाला लागणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात या नाराजीनंतर प्रशासनावर कवडीचाही परिणाम झालेला रविवारी दिसला नाही.
काय म्हणाले होते डॉ. राजेंद्र सिंह

गोदामाईच्या स्वरूपाविषयी माझ्या मनात अत्यंत वेगळी प्रतिमा होती. आज अनेक वर्षांनी प्रत्यक्षात या उगमस्थानी भेट दिल्यानंतर त्या प्रतिमेला तडा पोहोचला आहे. गोदामाईच्या आवाजाकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. हे चिन्ह धोक्याची घंटा वाजविणारे आहे. प्रशासनाने कुंभमेळ्यापूर्वी गोदामाईला गटारमुक्त करावे, अन्यथा येथील कुंभमेळाच रद्द करावा.
काय चित्र होते रविवारी?

रविवारी गोदाघाटावर फेरफटका मारला असता, अस्वच्छता किंचितही कमी झाल्याचे दिसले नाही. रोकडोबा तालीमसमोर वाहने धुण्याचे काम दिवसभर सुरू होते. वाहनांचे ऑइलही नदीपात्रात दिसत होते; परंतु वाहने धुणार्‍यांना हटकणारे कोणी नव्हते. नदीपात्रात कपडे धुणार्‍या महिला दिसत होत्या. तसेच, भाजीपालाही सर्रासपणे धुण्याचे काम काही व्यावसायिक करीत होते. नदीपात्रात सोडण्यात येणारे सांडपाणीही शनिवारइतक्याच प्रमाणात सोडले जात होते. सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ अस्वच्छतेमुळे सुटलेली दुर्गंधीही भाविकांना ना-काला रूमाल लावायला भाग पाडत होती.
नदीपात्राचे महात्म्यच विस्मरणात
देशभरात जी काही मोजकी प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत, त्यात नाशिकचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. त्यात गोदावरीचे महात्म्य भाविकांसाठी महत्त्वपूर्ण आहे. मात्र, प्रत्यक्ष भेट दिल्यावर हे महात्म्य क्षणार्धात विस्मरणात जाते. डॉ. राजेंद्र सिंह यांच्यासारख्या पर्यावरणतज्ज्ञाने प्रशासनाचे कान टोचल्यावरही अस्वच्छता कमी होत नाही. गणेश सांगळे, नागरिक
वक्तव्य केवळ बातमीपुरतेच मर्यादित
गोदावरीचे पवित्र असलेले पात्र सांडपाणी सोडून अपवित्र करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. खरे तर, गोदापात्रात घाण करणार्‍यांवर गुन्हा दाखल व्हायला हवा. डॉ. राजेंद्र सिंह यांच्यासारख्या व्यक्ती नदीपात्राच्या अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त करतात तेव्हा ही बाब केवळ एका बातमीपुरतीच र्मयादित राहाते, हे दुर्दैव. प्रशासन त्याची कुठलीही दखल घेत नाही. दिगंबर गोसावी, नागरिक