नाशिक - आर्थिक खडखडाटामुळे मूलभूत कामांमध्ये अडचणी येत असल्याची बाब लक्षात घेता आता महापालिकेने राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत केंद्र शासनाकडे ५२१ कोटी रुपयांचा आराखडा पाठवला आहे. त्यातून निधी मिळाल्यास महापालिकेला भुयारी गटार, मलनिस्सारणासाठी कामे करता येणार आहेत.
केंद्राने नदी स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्याची तयारी दाखवली आहे. त्या अनुषंगाने नदी संवर्धन योजनाही सुरू केली आहे. याच योजनेत नाशिकचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. यात प्रामुख्याने गंगापूर मलनिस्सारण केंद्राची १८ एमएलडी, तर पिंपळगाव खांब येथील ३२ एमएलडीचा समावेश आहे. अस्तित्वातील मलनिस्सारण केंद्रांची क्षमताही वाढवली जाणार आहे. पाण्याचा फेस दुर्गंधी कमी करणे तसेच बीओडी १० टक्क्यांपेक्षा कमी करण्याची प्रमुख अट आहे. याव्यतिरिक्त अहिल्याबाई होळकर ते गाडगे महाराज पूल येथे घाट बांधण्याचे नियोजन आहे. दारणा, वालदेवी, नासर्डी अशा नद्यांमध्ये सांडपाणी मिसाळणार नाही, याचीही दक्षता घेतली जाणार आहे.