आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्ग मोकळा: नाशिक महापालिकेत 977 जागांच्या भरतीची तयारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- 650 कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव महासभेत मंजूर झाल्याने महापालिकेतील लांबणीवर पडलेल्या नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रशासनाने 977 जागांच्या भरतीची तयारी सुरू केली असून, पदोन्नतीचा ठराव प्राप्त होताच ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

तत्कालीन आयुक्त बी. डी. सानप व माजी महापौर नयना घोलप यांनी सन 2011 मध्ये रिक्त जागा भरण्यासंदर्भात निर्णय घेत भरती प्रक्रिया राबविली. त्यासाठी सुमारे 18 हजार इतक्या मोठय़ा प्रमाणावर उमेदवारांनी अर्ज केले होते. पुणेस्थित एमकेसीएल या संस्थेकडे भरतीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. उमेदवारांच्या अर्जांची छाननी करून तशी यादीही जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्यात गैरप्रकार झाल्याचे आरोप करीत नगरसेवकांनी महासभेत ही भरती प्रक्रियाच स्थगित करण्याची एकमुखी मागणी केली होती. त्यामुळे घोलप यांना भरती स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. तेव्हापासून आजतागायत ही प्रक्रिया स्थगित असून, आता आगामी सिंहस्थ आणि त्यापूर्वी विधानसभा व लोकसभा निवडणुकीमुळे पुन्हा एकदा नोकर भरतीचा विषय चर्चेत आला आहे. पदोन्नतीचा प्रस्तावही मंजूर झाल्याने आता प्रशासनाला प्रतीक्षा आहे ती केवळ ठराव प्राप्त होण्याची.

ठराव प्राप्त होताच भरती
महासभेत पदोन्नतीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. त्यासंदर्भात ठराव प्राप्त झाल्यानंतर नोकर भरतीची कार्यवाही सुरू केली जाणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने ही भरती होणे गरजेचे आहे. सध्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे विविध विभागांच्या कामांवर त्याचा ताण निर्माण होत आहे.
- संजय खंदारे, आयुक्त, महापालिका