आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation Toll Fee Phone Number Issue

टोलवाटोलवी फ्री..;महापालिकेच्या मोफत तक्रार निवारण सेवेचा वाईट अनुभव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महापालिकेने सुरू केलेल्या टोल फ्री क्रमांक सेवेचा पहिल्याच दिवशी नागरिकांना वाईट अनुभव आला आणि ‘फुकट येथे तक्रार केली’ असा मनस्ताप झाला. अन्य सरकारी विभागांप्रमाणेच येथेही टोलवाटोलवीच जारी राहण्याचे संकेत मिळाले.

वाढलेली अस्वच्छता, मोकाट कुत्री-जनावरांचा वावर, रस्त्याच्या कडेला खराब वस्तू व बांधकाम साहित्य टाकणे, अनधिकृत व अतिक्रमित बांधकामे याविषयी नागरिकांच्या अनेक तक्रारी असतात. मात्र, संबंधित यंत्रणेशी नागरिकांचा संपर्क होऊ शकत नसल्याने आयुक्त संजय खंदारे यांनी गेल्या आठवड्यामध्येच महापालिका हेल्पलाइन क्रमांक सुरू करत असल्याचे सांगितले होते. त्यानुसार या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महापालिकेला हेल्पलाइन क्रमांक मिळाला. कुणाच्या खिशाला आर्थिक झळ नको म्हणून महापालिकेने हा क्रमांक टोल फ्री ठेवला आहे.

सोमवारी या क्रमांकावर या प्रतिनिधीने ‘सामान्य नागरिक’ म्हणून संपर्क साधला असता संबंधित कर्मचार्‍याला टोल फ्री क्रमांकाविषयी काहीच माहीत नसल्याचे समोर आले. ‘तक्रार निवारण’ केंद्रामध्ये बसलेल्या या कर्मचार्‍यास तक्रारदाराशी कसे आणि काय बोलावे याविषयी प्रशिक्षणच नसल्याचेही आढळून आले.

टोल फ्री संवाद
>प्रतिनिधी : नमस्कार, कुठला क्रमांक आहे?
>कर्मचारी : महापालिकेचा नंबर आहे.
>प्रतिनिधी : महापालिकेचा म्हणजे कोणत्या विभागाचा?
>कर्मचारी : तक्रार निवारण केंद्राचा नंबर आहे.
>प्रतिनिधी : ओ. के., नासर्डी नदीच्या कडेला बांधकाम साहित्य आणून टाकले जात आहे.
>कर्मचारी : तुम्ही असं करा, 2504233 या क्रमांकावर संपर्क साधून तिकडेच माहिती द्या.
>प्रतिनिधी : हा कुठला क्रमांक आहे?
>कर्मचारी : पूर्व विभागीय कार्यालयाचा नंबर आहे.
>प्रतिनिधी : अहो, पण तुमच्या केंद्राचा क्रमांक तक्रार करण्यासाठीच आहे ना? तुमचे नाव काय?
>कर्मचारी : जाधव नाव आहे माझं.
>प्रतिनिधी : पूर्ण नाव सांगा ना साहेब.
>कर्मचारी : तुम्ही काय आमची परीक्षा घेताय का? दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा.