आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation Use For Road Resurfing

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक महापालिक मुख्य रस्त्यांना लावणार अस्तर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि त्याविरोधात सर्वच स्तरांवर निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मुख्य 63 रस्त्यांच्या अस्तरीकरणाचे (रिसर्फेसिंग) काम हाती घेतले आहे. त्यासाठी 45 कोटींचा स्वतंत्र निधी ठेवण्यात आला आहे. आगामी कुंभमेळ्याला प्रारंभ होण्यापूर्वी, येत्या वर्षभरात हे सर्व रस्ते चकाचक करण्याचा मनोदय पालिका प्रशासनाने जाहीर केलेला असतानाच सामान्य नागरिक मात्र या योजनेची गत ‘ये रे माझ्या मागल्या’सारखी होऊ नये, अशी आशा करीत आहेत.

या रस्त्यांसाठी पालिकेने स्वतंत्र निधीची व्यवस्था केली आहे. डिफर्ड पेमेंटद्वारे केल्या जाणार्‍या बांधकामांशी या रस्त्यांच्या कामांचा संबंध नसून, महापालिकेच्या निधीतूनच प्राधान्याने ही कामे केली जाणार आहेत. 63 कामांपैकी बहुतांश रस्ते मागील कुंभमेळ्यामध्ये करण्यात आलेले होते. त्यानंतर यापैकी एकाही रस्त्याच्या अस्तरीकरणाचे काम हाती घेण्यात आलेले नव्हते.

पावसाळ्याला प्रारंभ होताच शहरातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडून वाहने हाकणे दुरापास्त झाले. पावसाचा जोर वाढल्यानंतर बहुतांश रस्त्यांची हालत आणखी खराब झाली. त्यामुळे सत्ताधारी मनसे टीकेचे लक्ष्य झाली. यामुळे खड्डय़ांच्या मलमपट्टीचे काम सुरू करण्यात आले. भर पावसात कॉँक्रिटीकरणाचाही प्रयोग करण्यात आला. त्यामुळे रस्ते सुधारणे बाजूलाच, वाहनचालकांच्या त्रासात भर पडली. राजकीय पक्षांनी ‘ओली’म्पिकसारखे अभिनव आंदोलनही केले. या सार्‍या पार्श्वभूमीवर आता पालिका प्रशासनाने अस्तरीकरण हाती घेतले असून, त्यातून खरोखरच चांगले रस्ते होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.


या प्रमुख रस्त्यांचे अस्तरीकरण
मुंबई-आग्रारोड ते नासर्डी पूल, स्वा. सावरकर उड्डाणपूल, सीबीएस ते कॅनडा कॉर्नर, दिंडोरीनाका ते म्हसरूळ, भोसला कॉलेज प्रवेशद्वार ते मते नर्सरी मुख्य रस्ता, मोडक पॉइंट ते सरदार विंचूरकर चौक, सत्कार पॉइंट ते वालदेवी पूल, तिडके कॉलनी ते कोयरन बंगला कर्मयोगीनगर, ग्लेनमार्क ते कार्बन कंपनी, त्रिमूर्ती चौक ते डीजीपीनगर, प्रसाद सर्कल ते निर्मला कॉन्व्हेंट, मेल्ट्रॉन ते लीअर कंपनी, कॅपिटल फूड्स ते अंबड घरपट्टी कार्यालय ते एक्स्लो सर्कल, डेल्टा मॅग्नेटिक ते अंबड पॉवर हाउस, स्टेट बँक ते लेखानगर, पंचवटी व म्हसरूळ - आडगाव लिंकरोड, सातपूर राज्य कर्मचारी वसाहत व परिसर, चार्वाक चौक ते 30 मीटर डीपीरोड, एक्स्लो पॉइंट ते चुंचाळे, हॉटेल सिबल बारा बंगला, भुजबळ फार्म ते एसटीपी सेंटर ते राणाप्रताप चौक पांडवनगरी, तुळजाभवानीनगर, सर्मथनगर, बिटको चौक ते शिवाजी महाराज पुतळा, कुलकर्णी गार्डन ते मायको सर्कल, अहिल्याबाई होळकर पूल ते रविवार कारंजा, संत जनार्दन स्वामी पूल ते मानूर, मालधक्कारोड ते रेल्वे क्रॉसिंग, पवननगर ते तोरणानगर, सिटी सेंटर मॉल ते उषाकिरण सोसायटी, श्रीहरी कुटे मार्ग.


काही बुजवले, काही बुजवणार
गेल्या आठवड्याभरात शहरातील 3546 खड्डे खडी-मुरूम तसेच डांबरमिर्शित मटेरियलने बुजवण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली. तसेच, आणखी 2608 खड्डे बुजविणे बाकी असून, येत्या आठवड्यात ते बुजवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


उपयोग कुंभमेळ्यासाठी..
शहरातील या मुख्य 63 रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. येत्या वर्षभरात ही सर्व 45 कोटींची कामे पूर्ण करून त्याचा उपयोग कुंभमेळ्याच्या दृष्टीने वाहतुकीसाठी करता येईल. सुनील खुने, शहर अभियंता