आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation,Latest News In Divya Marathi

‘मनसे’आंदोलनानंतर फायलींना मिळाली गती; 15 प्रकरणे उद्या ठेवणार स्थायी समितीसमोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पाच लाख रुपयांच्या किरकोळ फायलीपासून तर मोठ्या कामांची प्रकरणे मंजूर होत नसल्याने सत्ताधारी मनसेने आंदोलन केल्यानंतर आठवडाभरात पंधरा महत्त्वाची प्रकरणे स्थायी समितीसमोर सादर झाली आहेत. आयुक्तांचा हात सैल झाल्यामुळे नगरसेवक सुखावले असून, गुरुवारी (दि. 31) स्थायी समितीच्या बैठकीत अनेक कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात सत्ताधारी मनसेने आयुक्तांकडे फायली तुंबल्याचा आरोप करत आंदोलन केले होते. पालिकेच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकून कर्मचा-यांना अडवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी मध्यस्थी करून आयुक्त संजीवकुमार यांच्याशी चर्चा केली. आयुक्तांनी फायली प्रलंबित नसल्याचा दावा करत, काही कामांना आर्थिक ठणठणाटामुळे ब्रेक लागल्याची खंतही व्यक्त केली. प्रभारी आयुक्तांविरोधात मनसे आक्रमक होत असताना शिवसेना, राष्ट्रवादी व कॉँग्रेसच्या नगरसेवकांनीही त्यास अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला होता. सर्वपक्षीय विरोध लक्षात घेऊन आयुक्त कार्यालयातून आता हळूहळू फायलींचा निपटारा होऊ लागला आहे. त्यामुळेच की काय बुधवारी आंदोलन झाल्यावर दोनच दिवसांत म्हणजेच गुरुवारी व शुक्रवारी 15 महत्त्वाचे प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवण्यात आले. शनिवार व रविवारची सुटी वगळता सोमवारी याच प्रस्तावांचा अभ्यास सभापती राहुल ढिकले यांच्याकडून सुरू होता. गुरुवारी स्थायी समितीची बैठक होणार असून, त्यात या प्रस्तावांवर चर्चा होणार आहे.

कामांना गती मिळेल
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे काही महत्त्वाची कामे रखडली होती. मात्र, आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर अनेक कामे मार्गी लागू शकतील. तसे नियोजन केले असून, स्थायी समितीवर दोन दिवसांत 15 कामांचे प्रस्ताव आले आहेत.
अ‍ॅड. राहुल ढिकले, सभापती, स्थायी समिती
आयुक्तांचा विषय लांबणीवरच
पालिकेला पूर्णवेळ आयुक्त देण्यासाठी सत्ताधारी मनसेने आंदोलन केल्यानंतर त्याच मागणीसाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न झाले. मागील आठवड्यात आंदोलन केल्यानंतर सभागृहनेते शशिकांत जाधव यांनी आठ दिवसांत आयुक्तांची नेमणूक न झाल्यास प्रभारी आयुक्त संजीवकुमार यांना अडवण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर गुरुवारी होणा-या स्थायी समिती बैठकीत मनसे पुन्हा आंदोलन करणार की नमते घेणार, याविषयी प्रशासकीय वर्तुळातच उत्सुकतेचे वातावरण आहे.