आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nashik Municipal Corporation,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'स्थायी' ची उधळपट्टी काँग्रेसच्या रडारवर, जादा दराच्या निविदा मंजुरीमुळे महापालिकेचे नुकसान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आगामी सिंहस्थ कुंभमेळा, भूसंपादन, दुरुस्ती व खरेदीच्या कामांसाठी स्थायी समितीकडून विनाचर्चा मंजूर होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या जादा दराच्या निविदांवर काँग्रेसने लक्ष केंद्रित केले असून, आता त्याची माहिती संकलित करून शासनाच्या लेखापरीक्षकांकडे तक्रार केली जाणार आहे. त्यासाठी गटनेते उत्तम कांबळे यांनी पुढाकार घेऊन काँग्रेसच्या नगरसेवकांसाठी बैठकही बोलावण्यात आली आहे.
स्थायी समितीचे सभापती राहुल ढिकले यांच्या कार्यकाळात सहा ते सात सभा झाल्या असून, फारशी चर्चा न करता कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर करण्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. प्रामुख्याने साधुग्राममधील कामांच्या कोट्यवधी रुपयांच्या निविदांवर आक्षेप असून, यात काही निविदा २५ टक्क्यांपर्यंत जादा दराच्या असल्याचा संशय आहे. दुसरी बाब म्हणजे अग्निशामक दलाची कोट्यवधी रुपयांची खरेदीही वादात सापडली आहे. स्थायी समिती सभेत प्रत्येक प्रस्तावावर चर्चा होणे अपेक्षित असताना पाच ते सात मिनिटांत मंजुरीचा धडाका लावला जात असल्यामुळे त्यामागे काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. मागील काळात िसंहस्थ कुंभमेळ्याच्या जादा दराच्या निविदा मंजुरीच्या प्रकरणाची शासनाने चौकशी केल्याचेही त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर शासनाच्या लेखापरीक्षकांना पत्र देऊन जादा दराच्या निविदा मंजुरी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
माजी सभापतींना 'डांबर' निविदांबाबतही संशय
स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांनी डांबराच्या जादा दराच्या निविदा संशयास्पद असल्याचा आक्षेप घेतला. ते म्हणाले की, माझ्या कारकीर्दीत जादा दराच्या निविदा मंजूर केलेल्या नाहीत. हे महापालिकेचे नुकसान असून, याकडे कोणीही लक्ष देत नाही, हे दुर्दैवी आहे.