आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक महापालिकेचा दिखाऊ अन् फसवा अंदाजपत्रक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘दिखाऊ’, ‘फसवा’, ‘केवळ आकड्यांचा फुगवटा’, ‘नागरिकांची दिशाभूल करणारे’ अशा शब्दांत महापालिकेच्या अंदाजपत्रकाबद्दल संताप व्यक्त करत नगरसेवकांनी मंगळवारी महासभेत महापौरांना धारेवर धरले. विविध योजना ठेकेदारांच्या हाती सोपवून महापालिका गुंडांच्या टोळ्या निर्माण करत असून, प्रशासनावर पकड नसल्यानेच महापौरांच्या निर्णयांना अधिकारी केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.

स्थायी समितीने सादर केलेल्या सन 2013-14 च्या अंदाजपत्रकास विशेष महासभेत मंजुरी देण्यात आली. अंतिम मंजुरी दिलेली एकही योजना पूर्ण होऊ शकलेली नाही, हे मागील बजेटचे वास्तव असल्याचे गुरुमितसिंग बग्गा यांनी निदर्शनास आणून दिले. विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीत होणारा गैरप्रकार लक्षात आणून देत क्षेत्रफळानुसार माहिती घेतल्यास किमान 200 कोटींची त्यात वाढ होऊ शकते, असे मत व्यक्त केले. चर्चेत शिवाजी गांगुर्डे, देवयानी फरांदे, अशोक सातभाई, शैलेश ढगे, प्रकाश लोंढे, संभाजी मोरूस्कर, शिवाजी सहाणे, संजय चव्हाण, तानाजी जायभावे, लक्ष्मण जायभावे, विनायक खैरे, यशवंत निकुळे, सुजाता डेरे आदींनी भाग घेतला.


असे झाले निर्णय
> फेरीवाला क्षेत्र धोरणाचे नियोजन चार टप्प्यात
> अभिनव भारत मंदिर वास्तूसाठी 50 लाखांची तरतूद
> महिला सक्षमीकरणासाठी महिला महोत्सव
> प्रत्येक विभागात महिला बचत गटांसाठी आधार केंद्र
> बेरोजगार युवकांसाठी विविध प्रशिक्षण योजना
> कुष्ठरोग्यांसाठी अर्थसाहाय्य योजना
> औद्योगिक वसाहतीत रस्ते, ड्रेनेज सुविधा
> पर्यावरणपूरक इमारती, कचरा व्यवस्थापन, पाण्याचा पुनर्वापर
> घरपट्टी, पाणीपट्टी वाढीसाठी सव्र्हे
> गोदावरी घाट विकासासाठी 50 कोटींची तरतूद
> शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी तीन कोटी

सभागृह नेत्यांनीच दिली कबुली
सभागृहनेते शशिकांत जाधव यांनी गेल्या वर्षभरात आयुक्त व अन्य अधिकार्‍यांनीच निर्णय घेतल्याची खंत व्यक्त करीत प्रशासनच सर्व करणार असेल तर आपण कशासाठी यायचे, असा प्रश्न केला. त्यातून मनसेचे प्रशासनावर नियंत्रण नसल्याची जणू कबुली देत एकप्रकारे हतबलता व्यक्त केली.


अशा केल्या सूचना
> उत्पन्नवाढीसाठी मिळकतींचा योग्य वापर
> सिडकोत अद्ययावत रुग्णालय
> सदस्य निधी एक ते सव्वा कोटी
> घंटागाडी योजनेविषयी सविस्तर अहवाल
> महासभेत ऑडिट रिपोर्ट
> पार्किंगसाठी बहुमजली वाहनतळ
> विनापरवानगी होर्डिंग्जवर कारवाई
> शॉपिंग सेंटर, गाळ्यांचा अहवाल
> विनापरवाना हॉटेल्सविरुद्ध मोहीम
> मुंबईतील नेहरू तारांगणच्या धर्तीवर तारांगण
> फाळके स्मारकाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास

तिघांनी केला सभात्याग
सभा सुरू होण्यापूर्वीच कन्हय्या साळवे आणि वैशाली भागवत यांनी प्रभागात पथदीप बंद असल्याने निषेधाचा फलक झळकावत सभात्याग केला. दिनकर पाटील यांनीही अंदाजपत्रकातील त्रुटी निदर्शनास आणून देत सभात्याग केला.