आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेटनिवडणूक ठरणार पालिका निवडणुकीची ‘लिटमस टेस्ट’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - नाशिकरोड येथील पोटनिवडणुकीमध्ये शनिवारी पैसे वाटपाच्या संशयावरून शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली. मात्र, याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली नाही. त्यामुळे दिवसभर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांवर लक्ष ठेवून होते. रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते प्रचार करताना दिसून येत होते. तर, पोलिसांनी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास वॉर्ड क्रमांक ३५ मध्ये ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली. मात्र, यावेळी कोणताही अनुचित प्रकार आढळून आला नाही. दरम्यान, रविवारी हाेणारी पाेटनिवडणूक सर्व राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली असून, अापली ताकद ते अाजमावत अाहेत. या पक्षांनी प्रचारावर जाेरदार भर दिल्याने ही पाेटनिवडणूक म्हणजे सात महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची एकप्रकारे लिटमस टेस्टच असल्याचे मानले जात अाहे.
संपूर्ण शहराचे लक्ष लागून असलेल्या नाशिकरोड येथील वॉर्ड क्रमांक ३५ आणि ३६ बच्या पोटनिवडणुकीचे रविवारी (दि. २८) मतदान होत आहे. शिवसेना, मनसे, भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी खूपच प्रतिष्ठेची केली आहे. शुक्रवारी सार्वजनिक प्रचाराची सांगता झाल्यानंतर शनिवारी दिवसभर पैसे वाटपाच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांवर लक्ष ठेवून होते. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून दाेन्ही प्रभागांत पोलिसांनी सशस्त्र संचलन केले. वॉर्ड क्रमांक ३५ आणि ३६ असे दोन्ही मिळून अाठ उमेदवार या पाेटनिवडणुकीत नगरसेवक पदासाठी आपले नशीब आजमावित आहेत. शनिवारी प्रचार थंडावला असला तरी दोन-दोन कार्यकर्ते नागरिकांच्या घरी जाऊन प्रचार करीत असल्याचे दिसून येत होते. पोलिसांनी झोपडपट्टी परिसरासह सर्वत्र बंदोबस्त ठेवला असला तरी दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीमुळे वातावरण तणावग्रस्त होते.

रविवारी सकाळी मतदानाला सुरुवात होणार असल्याने पोलिसांनी बंदोबस्तासाठी अधिक कुमक मागविली आहे. शनिवारी दुपारी पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय देशमुख, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संचलन केले. यावेळी शीघ्र कृती दलाचे जवान, पोलिस यांच्यासह वज्र, दंगल निवारण वाहन, शस्त्रधारी पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

ढोल-ताशा नव्हे, तर परेड बॅण्ड
पोलिसांनी निवडणुकीपूर्वीच्या संचलनासाठी बॅण्ड ठेवला होता. मात्र, नागरिकांनी प्रथमच संचलनासाठी बॅण्ड पाहिल्याने ढोल-ताशांमध्ये पोलिसांचे संचलन अशी चर्चा परिसरात रंगली होती.
बातम्या आणखी आहेत...