नाशिक - राज्य निवडणूक अायाेगाने बुधवारी दुपारी महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजवल्यानंतर त्याच्या तयारीसाठी प्रशासन सज्ज झाले अाहे. तातडीने बैठक घेऊन येत्या ४६ दिवसांत निवडणूक हाताळण्यासाठी प्राथमिक तयारीबाबत अाढावा घेण्यात अाला. निवडणुकीसाठी १४३३ मतदान केंद्रे (बूथ) राहणार असून एका मतदान केंद्रावर ७५० मतदार अापला हक्क बजावतील.
अतिरिक्त अायुक्त अनिल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासन उपायुक्त विजय पगार यांच्यासह खातेप्रमुखांची बैठक झाली. दहा लाख ७४ हजार ८४५ मतदार संख्या लक्षात घेत एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त ७५० याप्रमाणे १४३३ मतदान केंद्रांचे नियाेजन अाहे. निवडणूक प्रक्रिया हाताळण्यासाठी १० निवडणूक निर्णय अधिकारी राहणार असून, ते उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी अाहेत. त्यांना १० सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिले जाणार असून, ते तहसीलदार संवर्गातील असतील. महापालिका निवडणुकीसाठी ८५०० कर्मचारी लागणार असून, त्यासाठी विविध सरकारी अास्थापना, निमशासकीय सरकारी कार्यालये, महाविद्यालये-शाळांची मदत घेतली जाणार अाहे.
असे असेल मतदान केंद्र : प्रत्येकमतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई असा पाच जणांचा समावेश असेल. तसेच, विभागीय निवडणूक निर्णय अधिकारीही असतील. तीन प्रभाग मिळून एक निवडणूक निर्णय अधिकारी याप्रमाणे ३० प्रभागांसाठी १० निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती हाेईल.
अाज मतदार यादी हाेणार जाहीर
४६दिवसांवर येऊन ठेपलेल्या पालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. १२) प्रारूप मतदार यादी जाहीर हाेणार असून, १७ जानेवारीपर्यंत मतदार यादीतील बदलाबाबत हरकती सूचना मागवून २१ जानेवारीला अंतिम मतदार यादी जाहीर हाेणार अाहे.
महापालिका निवडणूक परीक्षा अन्य कारणांमुळे फेब्रुवारीतच हाेणार अाहे. सुदैवाने, पालिका निवडणुकीचे मतदान दुसऱ्या टप्प्यात असल्याने तयारीसाठी प्रशासनाला अतिरिक्त पाच दिवस मिळाले. विधानसभा मतदार यादी महापालिका मतदार यादी मिळून संयुक्त मतदार यादी तयार करण्यात अाली अाहे. त्यात दहा लाख ७४ हजार ८४५ मतदार अाहेत. १७ जानेवारीपर्यंत मागवलेल्या हरकती सूचनांमध्ये प्रामुख्याने मूळ यादीतील नाव, पत्ता प्रारूप यादीत चुकले असल्यास दुरुस्तीसाठी संधी मिळेल.
एका प्रभागातील व्यक्ती दुसऱ्या प्रभागात गेली असल्यास ताे बदलही केला जाईल. दुसरीकडे, अंतिम मतदार यादी हाती अाल्यानंतर प्रचारासाठी जेमतेम एक महिना मिळणार असल्याने उमेदवारांसह राजकीय पक्षांतून नाराजी व्यक्त हाेत अाहे.
... तर इव्हीएमची संख्या हाेणार दुप्पट
एका इव्हीएममध्ये १६ उमेदवारांना मतदान करण्याची साेय अाहे. एका प्रभागात चार मते द्यायची असल्यामुळे किमान चार इव्हीएम मशीन ठेवणे क्रमप्राप्त अाहे; मात्र साेळापेक्षा अधिक उमेदवार असल्यास इव्हीएमची संख्याही दुप्पट हाेणार अाहे.