आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेची इंग्रजी शाळा बंद; १७८ विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक; महापालिकेने सातपूरमधील अशोकनगर भागात चार वर्षांपूर्वी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली; मात्र चौथीनंतर विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षण कुठे घ्यायचे, यावरून शिक्षक, पालक प्रशासन अशा सर्वच घटकांमध्ये संभ्रमावस्था असल्याने १७८ विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न अधांतरी आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी ‘सेमी इंग्रजी’मध्ये प्रवेश घ्यावा, या प्रशासनाच्या सल्ल्याविरोधात पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले.
विश्वासनगर परिसरात नगरसेवक शशिकांत जाधव यांच्या प्रयत्नांतून पालिका शाळा क्रमांक २२ मीनाताई ठाकरे विद्यालय ही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाली. अनेक पालकांनी पाल्यांचे नाव पहिल्या इयत्तेपासूनच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकले. मात्र, यंदा चौथीतून पाचवीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्या शाळेत प्रवेश घ्यायचा या विवंचनेत पालक आहेत. पालकांना शाळेतून ‘इंग्रजी शाळा बंद होत असून, तुम्ही सेमी इंग्लिशमध्ये पाल्यांचा प्रवेश घ्या’, असे उत्तर देण्यात आले. वैशाली खैरनार, लीलाधर भामरे, पूनम केदार, सविता पंडित, वैशाली रोकडे, शिवनाथ साळवे, मीनाक्षी अहिरराव, कविता उगले या पालकांनी आंदोलन केले. नगरसेवक जाधव कल्याण-डोबिवली महापालिका निवडणुकीत व्यस्त असल्याने त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही.

प्रशासनाचा चुकीचा निर्णय
इंग्रजीमाध्यमाची शाळा सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन प्रशासनाने घाईने घेतलेला होता. एलबीटी जकात बंद झाल्याने आर्थिक धोरणामुळे शाळा पुढे चालविणे कठीण होत आहे. सेमी इंग्रजी शाळेस अनुदान मिळू शकेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात अाला आहे. संजयचव्हाण, सभापती,शिक्षण समिती, मनपा

योग्य निर्णय घेऊन नुकसान टाळावे...
चुकीच्यानिर्णयाची शिक्षा विद्यार्थ्यांना का? कामगारवर्ग असल्याने शिक्षणाचा खर्च परवडत नाही. प्रशासनाने विद्यार्थ्यांचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे. छायाभामरे, पालक

आत्मविश्वासावर होणार परिणाम
महापालिकेच्याया शाळेबाबतच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो. शकीलापिंजारी, पालक

‘सेमी’चा पर्याय फायद्यासाठीच
इंग्रजीमाध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला नाही. मात्र, चौथीनंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी खासगी शाळेत जावे लागून मोठे शुल्क भरावे लागेल. त्यामुळे त्यांना सेमी इंग्रजी शाळेचा पर्याय दिला आहे. उमेशडोंगरे, प्रशासनाधिकारी,शिक्षण मंडळ