आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रखडलेल्या कामांवरून प्रशासन गेडाम लक्ष्य, जाचक अटी टाकून रखडवले शहरातील महत्त्वाचे प्रश्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेचे माजी अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांच्या बदलीमागे भाजप असल्याची चर्चा झडत असतानाच, स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवक दिनकर पाटील यांनी नवनिर्वाचित अायुक्तांना शहरातील महत्त्वाचे भिजत पडलेले प्रश्न लक्षात अाणून देण्याच्यानिमित्ताने प्रशासनाकडून मागील काळात कशा पद्धतीने अडवणुकीचे धाेरण राबवले गेले, असे सांगत जाेरदार तोफ डागली. जाचक अटी टाकून उद्यान, घंटागाडी खत प्रकल्पाची कशी वाट लावली, हे सांगताना त्यांनी अप्रत्यक्षपणे गेडाम यांनाही लक्ष्य केले.
स्थायी समितीची बैठक तशी बघितली तर गुरुवारी निव्वळ अाैपचारिकताच हाेती. नवनिर्वाचित अायुक्त अभिषेक कृष्णा यांच्या सत्काराचे निमित्त हाेते. त्यामुळे स्थायी समितीत एरवी बाह्या सरसावून येणाऱ्या सदस्यांची देहबाेली मवाळ हाेती. प्रकाश लाेंढे यांनी सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर नेहमीप्रमाणे दिनकर पाटील फलंदाजीला अाले पाहता पाहता पाटील यांनी शहरात गेल्या वर्षभरापासून भिजत पडलेल्या प्रश्नांची अायुक्तांना जाणीव करून देण्याच्यानिमित्ताने अप्रत्यक्षपणे गेडाम यांना लक्ष्यही केले. ते म्हणाले की, उद्यान, घंटागाडी, खत प्रकल्प असे शहरावर थेट परिणाम करणारे असंख्य विषय रखडले अाहेत. त्यास प्रशासनाची कार्यपद्धती कारणीभूत अाहे. उद्यानांच्या देखभालीचे कंत्राट देताना इतक्या जाचक अटी टाकल्या आहेत की, सुधारणा करूनही ठेकेदार प्रतिसाद देत नाहीत. खत प्रकल्पावरून हरित लवादाने शहरातील बांधकाम परवानग्या राेखून धरल्या अाहेत. मात्र, खत प्रकल्प तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न नाही. घंटागाडीचा नवीन ठेका अंतिम हाेत नसून, जुन्या ठेकेदारांना मुदतवाढ देण्यातच रस दाखवला जात अाहे. थाेडक्यात जाचक अटी निर्माण करून शहरातील महत्त्वाचे प्रश्न धगधगत ठेवायचे असा प्रशासनाचा डाव असल्याचा अाराेप करत त्यांनी माजी अायुक्तांना चिमटा घेतला. २०१४ पासून एकही वृक्ष लागवड झाली नाही. मानधनावर कर्मचारी भरतीचा प्रश्न रखडला असून, अाजघडीला शहराच्या वाढत्या लाेकसंख्येच्यादृष्टीने पालिकेचे मनुष्यबळ वाढविणे गरजेचे अाहे. मात्र, काही ना काही कारणामुळे त्यात खाे घातला जात अाहे.
फाळकेस्मारकाचा खर्च अधिकाऱ्यांकडून वसूल करा : फाळकेस्मारक, बुद्धविहार देखभाल-दुरुस्तीचे काम प्रशासनाला मूळ निविदा कालावधी खंडित झाल्यानंतर स्थायीच्या अनुमतीशिवाय दिला अाहे. त्यामुळे यासंदर्भातील खर्च काम देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून वसूल करावा, अशीही मागणी दिनकर पाटील यांनी केली.

नगरसेवक निधीचे तातडीने नियाेजनाचे अादेश
दरम्यान,सभापती सलीम शेख यांनी नगरसेवकांचा चालू वर्षी ६० लाख रुपयांचा निधी कसा खर्च हाेईल, यादृष्टीने नियाेजनाचे अादेश प्रशासनाला दिले. याबराेबरच मानधनावरील भरतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, सिंहस्थ कुंभमेळ्यात काम करणाऱ्या अग्निशामक कंत्राटी कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. शहरातील सर्व पालिका रुग्णालयांमध्ये अाैषधसाठा अाहे किंवा नाही, याची खातरजमा करणे एमअारअाय मशिनरी कार्यान्वित करावी, अशाही सूचना केल्या.

बातम्या आणखी आहेत...