आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकचे प्रशासन ‘मनसे’ कामाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरही कुंभमेळा व अंदाजपत्रकातील महत्त्वाच्या कामांना गती मिळत नसल्याची तक्रार महापालिकेतील सत्ताधारी मनसेने केल्यानंतर शनिवारी सुटीच्या दिवशी प्रभारी आयुक्त संजीवकुमार यांनी कामांची पाहणी करून सुमारे पाचशे कोटींच्या कामांसह साधुग्राम व प्रमुख रिंगरोडच्या कामांचा आढावा घेतला.
गेल्या वेळी अटीतटीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागलेल्या मनसेवर यावेळच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढवली. विधानसभेच्या तोंडावर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे नाशिक मॉडेलचे एकमेव भांडवल असताना त्याचीही धूळधाण उडाल्यामुळे उरल्यासुरल्या तीन महिन्यांत पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी मनसे पदाधिकार्‍यांची धडपड सुरू झाली आहे. त्यातूनच शुक्रवारी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार वसंत गिते यांनी समस्यांचा पाढा वाचला होता.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरही अधिकारी सक्रिय नसल्याची तक्रार केल्यानंतर प्रभारी आयुक्त संजीवकुमार यांनी त्याची दखल घेतली व शनिवारी सकाळपासूनच अधिकार्‍यांसमवेत शहरात कामांच्या पाहणीला सुरुवात केली.
सध्या शहरात प्रामुख्याने साडेतीनशे कोटी रुपयांची रस्त्यांची कामे सुरू असून, त्यांच्या दर्जाची तपासणीही आयुक्तांनी केली. गंगापूररोडवर वृक्षतोडीला परवानगी नसल्यामुळे रस्त्यांची कामे खोळंबल्याची बाब अधिकार्‍यांनी या वेळी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. साधुग्राममधील तात्पुरती बांधकामे, तसेच मलजलशुद्धीकरण केंद्रांचीही आयुक्तांनी पाहणी केली. याबरोबरच, निलगिरी बाग येथील घरकुल योजनेतील इमारतीत रहिवासी स्थलांतरित झाले आहेत का, याची तपासणी करीत तेथील समस्यांचा आढावाही त्यांनी घेतला. पाणीपुरवठा, भुयारी गटार अशा जवळपास दीडशे कोटी रुपयांच्या कामांची सद्यस्थिती आयुक्तांनी जाणून घेतली.